हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना
By रमेश वाबळे | Published: March 19, 2023 12:32 PM2023-03-19T12:32:52+5:302023-03-19T12:33:15+5:30
जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले.
हिंगोली : मुक्कामी एसटी बसफेरी घेवून गेलेल्या चालकावर श्वानाने हल्ला केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे १९ मार्च रोजी पहाटे ५ च्या सुमारास घडली. श्वानाने चालकाच्या पायाला, पाठीला चावा घेतला असून, जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले.
हिंगोली एसटी आगारात कार्यरत राहुल किसन पाटील (चालक क्र.६०२) व वाहक सिताराम यादव १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता हिंगोली- जयपूर मुक्कामी बसफेरी करण्यासाठी गेले होते. १९ मार्चच्या पहाटे ५ च्या सुमारास राहुल पाटील शौचालयात जात असताना एका श्वानाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या पायाला, पाठीला श्वानाने चावा घेतला. यामध्ये अंगावरील कपडेही फाटले. अशा स्थितीत त्यांनी जयपूर येथून प्रवासी घेत बस कौठा येथे आणली. या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर बस हिंगोली आगारात आणल्यानंतर त्यांच्यावर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण भागात मुक्कामी बस फेरीसाठी जाणाऱ्या चालक, वाहकांना रात्र एसटी बसमध्येच काढावी लागते. त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नसते. त्यामुळे एसटी चालक, वाहकात नाराजी व्यक्त होत आहे.