हिंगोलीत घरगुती सिलिंडर जप्तीच्या कारवाईने व्यावसायिकांची धावपळ

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: April 5, 2023 06:41 PM2023-04-05T18:41:56+5:302023-04-05T18:42:50+5:30

हिंगोली शहर पोलिसांची कारवाई ; घरगुती सिलिंडरचा होत होता वापर

Domestic cylinder confiscation drives businessmen on the run | हिंगोलीत घरगुती सिलिंडर जप्तीच्या कारवाईने व्यावसायिकांची धावपळ

हिंगोलीत घरगुती सिलिंडर जप्तीच्या कारवाईने व्यावसायिकांची धावपळ

googlenewsNext

हिंगोली : व्यावसायिक सिलिंडरच्या ऐवजी घरगुती सिलिंडरचा वापर करणाऱ्या हॉटेल, मांस विक्रेत्यांच्या दुकानावर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये एकच धांदल उडाली होती.  

गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ झाल्याने सध्या अकराशेवर सिलिंडर पोहचला. त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वयपांक गॅसवरून चुलीवर येत आहे. त्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही मार्च महिन्यात ३५० रूपयांची वाढ झाली. त्यामुळे हॉटेल, चहाटपरी, मांस विक्रेते, खानावळ, स्वीटमार्ट आदी ठिकाणी सर्रास घरगुती सिलिंडरचाच वापर होत असल्याचे चित्र आहे.  असे असताना या संदर्भात कारवाई होत नसल्याचा आरोपही होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मंगळवारी रात्री हिंगोली शहर पोलिसांनी शहरात घरगुती गॅस सिलिंडर वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरूद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. दोन ठिकाणी सिलिंडर जप्त करून हॉटेल चालक व मांस विक्रेत्यावर गुन्हाही दाखल केला. पोलिस घरगुती गॅस सिलिंडर जप्त करीत असल्याची माहिती इतर व्यावसायिकांपर्यंत पोहचताच काही वेळातच हॉटेल, चहा टपरी, खानावळ, स्विटमार्ट आदी ठिकाणचे घरगुती सिलिंडर गायब झाले. घरगुती सिलिंडर लपून ठेवण्यासाठी धावपळ होत असल्याचे चित्र होते. या कारवाईमुळे घरगुती सिलिंडरचा वापर करणाऱ्यांमध्ये चांगलाच वचक बसला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलिस उप निरीक्षक अशोक कांबळे, पोलिस अंमलदार संजय मार्के, जाधव, अमजद शेख आदींच्या पथकाने केली.

दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
मंगळवारी रात्री दोघांविरूद्ध कारवाई करण्यात आली. प्रत्येकी एक असे दोन सिलिंडर पोलिसांनी जप्त केले.  यात पोलिस उप निरीक्षक अशोक कांबळे यांच्या फिर्यादीवरून असलम कुरेशी महेबूब कुरेशी (रा. हिंगोली),  शेख अन्सार शेख कौसर (रा. हिंगोली) याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले तपास करीत आहेत.

Web Title: Domestic cylinder confiscation drives businessmen on the run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.