बंडखोर, गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांचे ऐकून घेऊ नका, असे म्हणणाऱ्यांचे कानशील लाल करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 03:46 PM2022-07-16T15:46:56+5:302022-07-16T15:48:23+5:30
चांडाळ चौकडीला बाजूला सारून मान-सन्मानाने बोलवा, विधानसभेवरील भगवा मानाने फडकत ठेवू
- विजय पाटील
हिंगोली : आम्ही शिवसेनेचे आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या मनात आहेत. चांडाळ चौकडीला बाजूला सारून आम्हाला मान-सन्मानाने बोलवा. हा भगवा असाच विधानसभेवर फडकवत ठेवू, अशी साद कळमनुरीचे बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी घातली. तसेच कोणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करा, असा इशारा देखील आ. बांगर यांनी यावेळी दिला.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. यावेळी ठाण्यातून नगरसेवक प्रसाद काळे, विशाल पावसे, राजेंद्र शिखरे, आ.संतोष बांगर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी बांगर म्हणाले, शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून कोणी हिणवत असेल तर ते ऐकून घेणार नाही, असे म्हणणाऱ्यांचे कानशील लाल करा. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मी त्याला पाठिंबा देईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होत असल्याने मी त्यांना पाठिंबा दिला. ते सामान्यांशी नाळ जुळालेले नेते आहेत.
जे सोबत येतील त्यांना मुख्यमंत्री निवडून आणणार
उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करणारी लबाड मंडळी पक्ष मागे पडत आहे, हे कळू देत नव्हती. आता राज्यात शिवसेनेचा भगवा प्रत्येक ठिकाणी डौलाने फडकेल. जे सोबत येतील, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. येत्या ८ ऑगस्टला ते हिंगोलीत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर शिवसेना ही एकच असून कोणी बाहेर असेल तर त्यांच्यावर टीका करू नका. ते आपलेच आहेत, असेही बांगर म्हणाले. यावेळी राजेश्वर पतंगे, फकिरा मुंडे, विठ्ठल चौतमल, साहेबराव देशमुख, सुभाष बांगर, राम कदम, औंढा नगराध्यक्ष कपिल खंदारे, उत्तमराव शिंदे, रेखा देवकते, प्रताप काळे, सपना कनकुटे, जया देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.