हिंगोलीकरांनो चिंता नको; चार महिने पुरेल एवढा औषधी साठा उपलब्ध
By रमेश वाबळे | Published: October 3, 2023 06:21 PM2023-10-03T18:21:22+5:302023-10-03T18:22:33+5:30
आरोग्य यंत्रणा सतर्क, औषधी साठ्यासह यंत्रसामुग्रीचा घेतला आढावा
हिंगोली : नांदेड येथील डाॅ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता हिंगोलीचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध औषधीसाठा, मनुष्यबळ आणि आवश्यक त्या यंत्रसामुग्रीचा आढावा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.नितीन तडस यांनी घेतला. येथील जिल्हा रुग्णालयात चार महिने पुरेल एवढा औषधीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी हिंगोलीकरांना चिंता करण्याची गरज नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
मागील पंधरवड्यापासून व्हायरल फिव्हरची साथ सुरू असून ताप, सर्दी, खोकला तसेच डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढल्यामुळे येथील जिल्हा रुग्णालयात गत महिन्याच्या तुलनेत जवळपास दीडपट रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे औषधी, गोळ्या, इंजेक्शनचा वापर वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला औषधी साठ्यावर विशेष लक्ष ठेवावे लागत आहे. त्यातच २ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या ३० च्या वर रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली.
या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, हिंगोलीत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.दीपक मोरे यांनी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आढावा घेतला. उपलब्ध औषधीसाठा, यंत्रसामुग्री आदींबाबत आढावा घेऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, येथील जिल्हा रुग्णालयात चार महिने पुरेल एवढा औषधीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्यातरी हिंगोलीकरांना औषधीसाठी इतरत्र जाण्याची गरज नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सतर्क राहा; सुट्यांवर जाऊ नका...
सध्या व्हायरल फिव्हरची साथ सुरू असल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.नितीन तडस यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, अत्यावश्यक कारण वगळता सुट्यांवर जाऊ नये, रुग्णांची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.