नालीचे बांधकाम होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:33+5:302020-12-22T04:28:33+5:30
आंबेडकर पुतळा परिसरात घाण नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणावर गावातील ...
आंबेडकर पुतळा परिसरात घाण
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणावर गावातील सांडपाणी जमा झाल्याने याठिकाणी घाणीबरोबर दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी नाली असून या नालीत सांडपाणी न जाता ते रस्त्यावर साचत आहे. याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आता या भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घाण पाणी जमा होत आहे. यासाठी गावातील सांडपाणी रस्त्याच्याकाठी असणाऱ्या नालीत जाण्यासाठी नालीच्या ठिकाणी उतार करुन हे पाणी नाल्यात काढून देण्यात यावे, अशी मागणी गावातून होत आहे.
तुरीची उधळण सुरूच
हाताळा : सेनगाव तालुक्यातील हाताळा शेतशिवारातील तुरी उधळल्या जात आहेत. यंदा गावासह शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे, पण अचानक हे सर्व तुरीचे पीक उधळल्या जात आहे. शेंगा धरल्यानंतर तुरीचे झाड पूर्णपणे वाळत असलेले पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सध्या तुरीच्या पिकाची कापणी सुरू केली असून या पिकांमध्ये मोठी घट झाली आहे.
जयपूर गावात वन्यप्राण्यांचा उपद्रव
जयपूर : सेनगाव तालुक्यातील जयपूर शेतशिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. सकाळी सकाळी रानडुकरे, हरिण, वानरांची टोळी शेतातील पिकांवर ताव मारुन पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. तसेच रात्रीच्या वेळीही शेतकरी पिकांची भिजवण करीत असताना वन्यप्राणी शेतात घुसत आहेत. तसेच कधी कधी रानडुकर रात्री शेतात येत असून त्यांना हाकलताना ते शेतकऱ्यांच्या अंगावर धावून येत आहेत. अनेकदा शेतशिवारात शेतमजूर व महिलावर्ग शेतीचे काम करीत असताना वन्यप्राणी अंगावर धावून येत असल्याने मजूरवर्गात या वन्यप्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. यासाठी संबंधित विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
सतत वीज पुरवठा खंडीत
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाचा वीज पुरवठा मागील दीड महिन्यांपासून वारंवार खंडीत होत आहे. अनेकदा याविषयीची तक्रार ग्रामस्थांनी महावितरण विभागाकडे केली. पण या तक्रारीचा कोणताही फायदा आतापर्यंत झालेला नाही. गावातून सतत गूल होणाऱ्या वीज पुरवठ्याला ग्रामस्थ वैतागले आहेत. तसेच रात्री वीज खंडीत झाल्यानंतर ही वीज दुसऱ्या दिवशी येत असून गावकऱ्यांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज गेल्याने अनेकदा चोरीच्या घटनाही गावात झाल्या आहेत. यासाठी रामेश्वर तांडा गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
उकीरड्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावातील अनेक वार्डात उकीरडे वाढले आहे. या उकीरड्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याने गावात दुर्गंध पसरत आहे. गावातील वार्ड क्रमांक १, २ व ३ मधील रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणावर उकीरडा जमा झालेला आहे. हा उकीरडा काढण्याची मागणी अनेकदा ग्रामस्थांतून करण्यात आलेली आहे. पण ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याने आता या उकीरड्याचा दुर्गंध संपूर्ण गावात पसरत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने हा उकीरडा साफ करण्यात यावा अशी मागणी गावातून होत आहे.
गावातील नळदुरूस्तीचे काम बंद
डिग्रस कोंढुर : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढुर गावातील नळ दुरूस्तीचे काम बंद असल्यामुळे गावात पाच वर्षापासून नळाचे पाणी बंद अवस्थेत आहे. यामुळे गावकऱ्यांना खाजगी बोअरधारकांकडून विकत पाणी घ्यावे लागत आहे. अनेक बोअरधारक ज्यांना पाणी हवे त्यांना ३०० ते ४०० रुपये प्रतिमहिना या दराने पाण्याची विक्री करीत आहेत. पण गावातील गरीब लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. यासाठी गावात नळ दुरूस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.
गावात मोर्चेबांधणीला आला वेगा
पानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेगावामध्ये राजकीय कार्यक्रमांना वेग आला आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या पक्ष मजबुतीसाठी मोर्चेबांधणी करीत गावकऱ्यांच्या भेटी - गाठी घेत आहेत. पानकनेरगाव ही १५ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यासाठी गावातील राजकीय पुढाऱ्यांसह कार्यकर्तेही निवडणुकीच्या कामात मग्न झालेले दिसून येत आहेत. यंदा प्रत्येकांमध्ये कोण बाजी मारेल यासाठी शर्यत सुरू झालेली आहे.
अखेर कोठारी ते पार्डी खुर्द रस्त्याच्या कामाला सुरुवात
वसमत : तालुक्यातील कोठारी ते पार्डी खुर्द असा तीन किलोमीटर रस्त्याच्या कामाला तीन महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली होती. रस्त्याच्या साईडने पुलाचे काम ही करण्यात आले. माञ संबंधीताकडून लाखोचा निधी उपलब्ध होऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित करण्यात आले. वसमत ते वारंगा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये जा होत असते. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकमतने पाठपुरावा केल्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.