वाहनचालकांची धावपळ! हिंगोली जिल्ह्यात ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट
By रमेश वाबळे | Published: January 2, 2024 04:08 PM2024-01-02T16:08:23+5:302024-01-02T16:09:09+5:30
ट्रक, टँकरचालकांनी नवीन मोटार कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेलचे टँकर येवू शकले नाही.
हिंगोली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक- टँकरचालकांनी आंदोलन पुकारले असून, यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, इंडेन गॅस बाॅटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टॅंकरचालक सहभागी झाले आहेत. परिणामी, जिल्ह्यातील ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट झाला आहे. तर उर्वरित पंपातील इंधनसाठाही सायंकाळपर्यंत संपण्याची शक्यता आहे.
ट्रक, टँकरचालकांनी नवीन मोटार कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेलचे टँकर येवू शकले नाही. त्यामुळे पंपांवर इंधनसाठा होऊ शकला नाही. तर जो काही शिल्लक साठा होता तो विक्री करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील ५१ पैकी १५ च्या वर पंपांवर पेट्रोल, डिझेलचा दुपारनंतर ठणठणाट झाला. हिंगोली शहरातील पोलिस प्रशासनाच्या पंपावर तर सकाळी १० वाजताच पेट्रोल संपले होते. तसेच इतर पंपांवरही साठा कमी असल्यामुळे दुपारनंतर पंपचालकांकडूनही वाहनांमध्ये इंधन भरताना हात आखडता घेण्यात येत होता. कुणी ५०० रूपयांच्या पेट्रोलची मागणी केली तर त्याला १०० ते २०० रूपयांचेच दिले जात होते.
ग्रामीण भागात लूट...
पंपांवरून कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल नेऊन ग्रामीण भागातील किराणा, पंक्चरच्या दुकानात विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी अवैधमार्गाने इंधन विक्री होते. मात्र, कारवाईचे कर्तव्य कुणी बजावत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, ग्रामीण भागातील किराणा, पंक्चर, पानपट्ट्यांवर सर्रासपणे पेट्रोलची विक्री होते. सध्याच्या परिस्थितीत दिडशे ते दोनशे रूपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे.