Drought In Marathwada : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ऊसतोडणीच्या कामासाठी कर्नाटकात स्थलांतर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:02 PM2018-11-02T13:02:45+5:302018-11-02T13:07:39+5:30

दुष्काळवाडा : दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने अख्खे गावच ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे स्थलांतरित होत आहे. 

Drought in Marathwada : Due to drought, farmers migrate to Karnataka | Drought In Marathwada : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ऊसतोडणीच्या कामासाठी कर्नाटकात स्थलांतर 

Drought In Marathwada : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ऊसतोडणीच्या कामासाठी कर्नाटकात स्थलांतर 

Next

- दयाशील इंगोले, दुर्गसावंगी, ता., जि. हिंगोली

हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी गावात काही दिवसांनी चिटपाखरू दिसणार नाही. दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने अख्खे गावच ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे स्थलांतरित होणार आहे. 

पावसाने दडी मारल्याने येथील सोयाबीन, तूर, कापूस उडीद व मूग ही पिके बळीराजाच्या हातची गेली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच निसर्गाने हिरावला. त्यामुळे दुर्गसावंगी गावातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. गावातील सर्व मंडळी आता काम करण्यासाठी कर्नाटक, नारायणगाव तसेच परराज्यांत जात आहे. दरवर्षीच कामाच्या शोधात अर्धे गाव स्थलांतरित होते. परंतु यंदा तर हातची पिके गेल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत.

विशेष म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना तर आता गाव सोडून परराज्यांत कामाशिवाय पर्यायच उरला नाही. लहान मुलाबाळांसह शेतकरी घराबाहेर पडत आहेत. गावाची लोकसंख्या जेमतेम १८०० च्या जवळपास आहे. सर्वांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. दुष्काळ  परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकरी मात्र हतबल झाल्याचे चित्र दिसून आले. शेतकऱ्यांना परराज्यांत घेऊन जाण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच मुकदम गावात आले होते. त्यांच्या वाहनांच्या रांगा गावात लागल्याचे पाहावयास मिळाले. दरवर्षी अर्धे गाव स्थलांतरित होते. परंतु यंदा दुष्काळ परिस्थितीमुळे नव्वद टक्के च्या वर स्थलांतर होणार आहे, असे गावकरी सांगत होते. गावातील अर्ध्या घरांना तर चक्ककुलूप दिसून आले. काही दिवसांपूर्वीच गावातून अनेक शेतकरी बाहेरील गावी गेल्याचे सांगितले. घर राखण करण्यासाठी वृद्ध माणसे मात्र दाराबाहेर दिसून आली. 

काही आकडेवारी : 
१७०० : गावाची लोकसंख्या 
५१६ : हेक्टर भौगोलिक क्षेत्र
४९९ : हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र 
४०० : हेक्टर सोयाबीन 
५३ : हेक्टर तूर
१० : हेक्टर ज्वारी 
०४ : हेक्टर कापूस 
०९ : हेक्टर उडीद
०८ : हेक्टर मूग
८७२ : मि. मी. पर्जन्यमान 
५५३ : मि. मी. पाऊस यंदा झाला

पिकांचे मोठे नुकसान झाले 
यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्गसावंगी येथील शेतकऱ्यांचे स्थलांतरही वाढले आहे. गावातील शेतकऱ्यांनी कामाची मागणी केल्यास शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
- एस. एम. सावंत, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?

- यंदा शेती भांडवलाचा खर्चही निघाला नाही. काही ठिकाणी ओलिताच्या जमिनी आहेत. परंतु वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही. - माधवराव कवडे 

- शेतकऱ्यांची यंदा दयनीय अवस्था होणार आहे. शेतातील हातची पिके तर गेली अन् आता गावातून स्थलांतर वाढल्याने गाव ओस पडणार आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून दुष्काळी मदत मिळाली पाहिजे. - दशरथ जमधाड 

- दोन एकरात कापूस व दोन एकरात सोयाबीन, तूर व उडीद अशी पिके घेतली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांसह कापूसही जाग्यावरच जळून गेला. दोन एकरात किमान पाच क्विंटल कापूस होईल, अशी आशा होती. परंतु आता एक क्विंटल तरी कापूस होईल की नाही, याची हमी नाही. - नारायण ढोणे 

- यंदा निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीनला चांगला उतारा नाही. गावात हाताला कामही मिळत नाही. त्यामुळे बाहेरगावी काम करून पोट भरल्याशिवाय पर्याय नाही. दरवर्षी गावातून ऊसतोडीसाठी स्थलांतर होते. परंतु यंदा चक्कगावच कर्नाटकला कामासाठी जाणार आहे. - गौतम साठे 

- गतवर्षीपेक्षा यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात गावातून स्थलांतर होत आहे. त्यामुळे गाव ओस पडणार आहे. आता दुकानात विक्रीसाठी भरलेले किराणा साहित्य कोण घेऊन जाणार? - शेख अखिल, दुकानचालक 

Web Title: Drought in Marathwada : Due to drought, farmers migrate to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.