Drought In Marathwada : पोटापाण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 02:28 PM2018-10-23T14:28:46+5:302018-10-23T14:29:30+5:30
दुष्काळवाडा : परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे.
- इलियास शेख, असोलवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासीबहुल गाव. या गावात अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचीच संख्या जास्त. यावर्षी पाऊस कमी पडल्याने पिके वाळून गेली. त्यातही पावसाचा खंड अधिक. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे.
या गावाची लोकसंख्या १४५०. कमी शेती असल्याने जवळपास सर्वच कुटुंब दसऱ्यानंतर कामाच्या शोधात स्थलांतर करतात. येथील शेतकरी ऊसतोड व हळदी काढण्यासाठी इतरत्र स्थलांतर करतात. वीट कारखाना तसेच मिस्त्रीच्या हाताखाली कामावर जातात. दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने डोळ्यासमोर पिके करपून जात आहेत. सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाहीत. वाळून गेल्या. खरबाड जमिनीवरची पिके तर गेल्यातच जमा आहेत. तुरीला अजून फुलोराच आला नाही. साहेब, शेतात जाऊ वाटत नाही. आता पोटापाण्याचे काय होणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला. मागील तीन वर्र्षांपासून सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीने आम्ही कदरलो आहोत. खरीप पिकाला लावलेला खर्चही निघत नाही. वर्षभर कसे जगावे, उदरनिर्वाह कसा करावा, संसाराचा गाडा कसा हाकावा, अशी आपबिती सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
चारा आणि पाण्याचा प्रश्न आहे
यावर्षी परतीचा पाऊस पडला नाही. पावसाचा खंड झाल्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. चारा पिकांचे नियोजन करावे, जनावरांचा चारा व त्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन करावे, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने एक शेततळे घ्यावे, संरक्षित पाणी असेल तरच रबीचे नियोजन करावे.
- गोविंद कल्याणपाड, तालुका कृषी अधिकारी
बळीराजा काय म्हणतो?
- माझ्या घरी ५ एकर कोरडवाहू शेती आहे. अत्यल्प पडलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. परिणामी तीनचा उतारा आला. शेतीत लावलेला पैसाही निघत नाही. वर्षभर काय खावे, कसा उदरनिर्वाह करावा, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
- माणिकराव असोले
- दोन महिन्यांपासून पाऊस नाही. कापसाची बोंडं फुटत नाहीत. सव्वाएकर शेतात संसाराचा गाडा कसा हाकावा? शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवतो. आम्हाला मजुरी करूनच पोट भरावे लागते.
- संतोष असोले
- अडीच एकरमध्ये मला ८ क्ंिवटल सोयाबीनचा उतारा आला. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघत नाही. मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांना त्याचा फटका बसला. परतीच्या पावसानेही दगा दिला. दुसऱ्याच्या कामावर जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.
- रामराव असोले
- या गावचे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक असून, डोळ्यासमोर पीक वाळून जात आहे. तुरीला तर अजून फुलोराही आला नाही. जमिनीत भेगा पडल्या आहेत. या हंगामात तूरही हातची गेली आहे. मला ५ एकर शेती असूनही त्यातून आतापर्यंत कधीच चांगले उत्पन्न झाले नाही. दरवर्षी काहीतरी वेगळेच कारण असते.
- बाबूराव काळे
- मोलमजुरी करूनच मी माझी एक एकर शेती करतो. त्यात यावर्षी काहीच हाती आले नाही. पेरणीचा खर्चही निघाला नाही. कामासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही. मुलाबाळांचे शिक्षण जाते. त्यामुळे येथेच मजुरी करून पोट भरावे लागते.
- अशोक काळे १४५० - लोकसंख्या
काही आकडेवारी :
२७८ - घरे
६६५ - मतदार
६४४.५५ - हेक्टर गावाचे भौगोलिक क्षेत्र
६०१.४७ - हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र
५९४ - हेक्टर पेरणी क्षेत्र
३१- हेक्टर खरीप ज्वारी
१०५ - हेक्टर कापूस
५५ - हेक्टर तूर
०९ - हेक्टर मूग
०७ - हेक्टर उडीद
९१६.६० - मि.मी. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान
७२९.३४ - मि.मी. यावर्षी पडलेला पाऊस
७९.५७% - पडलेला पाऊस