दारू पिऊन वाहनचालक तर्राट ; कोरोनामुळे कारवाई थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:37+5:302021-07-04T04:20:37+5:30
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाकडून नियमित कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे ...
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाकडून नियमित कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. मात्र कोरोनामुळे दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या चालकांवरील कारवाईला मर्यादा येत असल्याने अशा वाहनचालकांना रोखायचे कसे? असा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर उभा राहत आहे.
जिल्ह्यातील वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन विविध उपक्रम हाती घेत आहे. यातून अपघाताच्या घटना टळण्यास मदत होत आहे. मात्र तरीही काही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, वाहने धोकादायक पद्धतीने चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालवित असल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर येत आहे. अशा वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागत आहे. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ ॲनालायझरच्या सहायाने तपासणी केली जात होती. मात्र कोरोनामुळे ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सायंकाळच्या सुमारास तर दारू पिऊन वाहने चालविणारे सहज लक्षात येतात. मात्र कोरोनामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई करताना मर्यादा येत आहेत.
ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद
हिंगोली शहर वाहतूक शाखेला दोन ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाभरात याद्वारे तपासणी होत असते. मात्र कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर थंड पडला आहे. जवळपास १५ महिन्यांपासून एकाही मद्यपी वाहनचालकावर कारवाई झाली नाही.
मद्यपी वाहनचालकावर झालेली कारवाई
महिना २०१९ २०२०
जानेवारी ०० ११
फेब्रुवारी ०४ ०२
मार्च ०३ ०५
एप्रिल ०६ ००
मे ०४ ००
जून ०६ ००
जुलै ०६ ००
ऑगस्ट ०० ००
सप्टेंबर ०६ ००
ऑक्टोबर ०५ ००
नोव्हेंबर ०६ ००
डिसेंबर १२ ००
२०२१ मध्ये मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई (जूनपर्यंत)
जानेवारी ००
फेब्रुवारी ००
मार्च ००
एप्रिल ००
मे ००
जून ००
मद्यपी वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी केली जाते. कोरोना संसर्गामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर सध्या बंद झाला आहे. परंतु, संशयित मद्यपी वाहनचालक आढळल्यास अशा वाहनचालकांची हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्याच्या सूचना वाहतूक शाखेला दिल्या आहेत.
- यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगोली
फोटो : १९