सुसाट दुचाकी अडवल्याने मद्यपी तरुणांची वाहतूक पोलिसास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:37 PM2020-02-27T13:37:43+5:302020-02-27T13:38:16+5:30
तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे
हिंगोली : सुसाट दुचाकी अडवल्याने मद्यपी तरुणांनी वाहतूक पोलिसास दमदाटी करून मारहाण केल्याची घटना बुधवारी ( दि. २६ ) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा तिघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहरातील रेल्वेगेट परिसरातून दुचाकी सुसाट वेगाने धावत होती. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या हिंगोली वाहतुक शाखेचे कर्मचारी पोहेकाँ गजानन महादजी सांगळे यांनी दुचाकीस अडवले. यानंतर दुचाकीचालक नितीन किसनराव कवडे याची त्यांनी चौकशी केली. यावेळी सांगळे यांनी ब्रेथअनालाझर मशिनने सदर दुचाकी चालकाची तपासणी केली असता त्याने मद्यपान केल्याचे आढळुन आले.
दरम्यान, दुचाकीचालक कवडे व त्यांचे दोन साथीदारांनी सांगळे यांच्यासोबत वाद घालणे सुरु केले. तसेच दमदाटी करून जबर मारहाण केली. याप्रकरणी गजानन सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नितीन किसनराव कवडे, राधेशाम विठ्ठल हरण, कमळाजी प्रल्हादराव हरण या तिघांविरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.