उपचारासाठी गेलेल्या मद्यधुंद तरुणांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:01 PM2019-01-16T18:01:28+5:302019-01-16T18:01:33+5:30
वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील चार तरुणांना अज्ञातांनी मारहाण केली होती.
जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजेदरम्यान उपचारासाठी चार मद्यधुंद तरुण दाखल झाले होते. मात्र रुग्णालयात गोंधळ घालत त्यांनी रुग्णालय व पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी दिली.
वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील चार तरुणांना अज्ञातांनी मारहाण केली होती. ते जवळाबाजार चौकीत फिर्याद देण्यास गेले असता पोलिसांनी पत्र देऊन उपचारासाठी त्यांना येथील आरोग्य केंद्रात पाठवले. चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्यांनी दमदाटी करुन शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांनी ही बाब वैद्यकीय अधिकारी डॉ.वरवरंटकर यांना फोनवर सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोउपनि ज्ञानोबा मुलगीर, अरविंद गजबार, संदिप बोचरे यांनी घटनास्थळी येऊन तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही दमदाटी केली.
याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्रून्म हनुमंतराव वरवंटकर यांच्या फियार्दीवरुन आरोपी कैलास रामकिसन क्षिरसागर, एकनाथ भरत सावंत, ज्ञानेश्वर दौलत क्षिरसागर, दिलीप रामकृष्ण क्षिरसागर (रा.बोरी सावंत) ता. वसमत यांच्याविरूद्ध भादंवि ३५३, ५०४, ५०६, ३४ नुसार हट्टा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तपास जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर करीत आहेत.