वन विभागाचाच पाणवठा कोरडा; इतरांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:19 AM2018-03-22T00:19:41+5:302018-03-23T12:07:13+5:30
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.
हिंगोली येथील रेल्वेस्थानक रोडवरील वन विभाग कार्यालयात तयार केलेल्या पानवठ्यातही पाण्याचा एकही थेंब टाकलेला नसेल तर जंगली भागातील पानवठ्याची काय स्थिती असेल? हे यावरुनच लक्षात येते. सध्या एवढे ऊन तापत आहे. दुपारनंतर पाण्याने जिवाची लाही-लाही होत आहे. जंगलात वन्यप्राण्यांना पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंतीशिवाय पर्यायच नाही. अन् एकीकडे मात्र वन विभाग जंगलात पाणी असल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक पाहता पाण्यासाठी भटकंती करणारे अनेक प्राणी कोरड्या विहिरीत तर कधी पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष करुन रोहि हा प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. तर रस्त्यावरही अनेकदा वाहनाला धडकला आहे. त्यामुळे जंगली भागात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करुन ठेवणे नितांत गरजेचे असतानाही वन विभागाकडून तसे मात्र अजिबात होत नाही. त्यातच जिल्ह्यात मध्ये विविध ठिकाणी असलेल्या मोठ- मोठ्या तलावातून रात्री - अपरात्री पाणी उपसा सुरु असल्याने त्याही तलावाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. तेथे पाणी पिण्यासाठी गेलेले वन्यप्राणी गाळात रुतून मृत पावत आहेत.
सध्यास्थितीत जंगली भागातील पानवठे पूर्णत: कोरडे झाल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करणारे प्राणी कधी अपघातात तर कधी विहिरीत पडून मृत झाले आहेत. शिवाय, रस्ता ओलांडताना अनेकदा दुचाकीची धडक वन्य प्राण्यांना बसत आहेत. त्यामुळे वनविभागाने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यप्रेमीतून होत आहे. तर यासंदर्भात विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या तरी जंगली भागातील पाणीसाठे कोरडे झालेले नाहीत. आम्ही नियमित पाहणी करत आहोत. मात्र १ एप्रिलपासून पानवठ्यात पाणी सोडले जाणार आहे.