युती आणि आघाडीने विधानसभा इच्छुकांचीही होतेय फरपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 04:51 PM2019-03-08T16:51:05+5:302019-03-08T16:57:11+5:30
अनेकांना भविष्यात उमेदवारी मिळाली नाही तर काय? ही चिंता सतावत आहे.
हिंगोली : लोकसभेला झालेली युती व आघाडी आता विधानसभा इच्छुकांचीही परीक्षा पाहणारी ठरत आहे. याचमुळे लोकसभा इच्छुकांचा आकडाही वाढला होता. मात्र अनेकांना भविष्यात उमेदवारी मिळाली नाही तर काय? ही चिंता सतावत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बिगूल कधीही वाजू शकतो. तरीही हिंगोली लोकसभेत अजून एकाही उमेदवाराची उमेदवारी निश्चित नाही. विद्यमान खा.राजीव सातव यांच्यावर गुजराथ व इतर राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी असल्याने त्यांनी निवडणूक लढायची की नाही, याचा निर्णय श्रेष्ठींवर सोपविला आहे. त्यामुळे मध्यंतरी आ.संतोष टारफे यांनीही चाचपणी केली. तर शिवसेनेतील इच्छुकांची संख्या अजूनही कमी झाली नाही. मात्र अंतिम यादीत आता मोजकीच नावे आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यात आ.जयप्रकाश मुंदडा, आ.नागेश पाटील, आ.हेमंत पाटील यांच्यापैकीच कुणीतरी रणांगणात उडी घेईल, असे दिसते. मात्र काहींनी आगामी विधानसभेचे गणित हुकत असल्यानेच उमेदवारीवर दावा केल्याचे दिसत आहे. त्यात रुपाली पाटील गोरेगावकर, रामेश्वर शिंदे आदींचा समावेश आहे.
लोकसभा तर गेली आता वसमतची जागाही आता सेनेला सुटणार हे लक्षात आल्यानंतर भाजपचे शिवाजी जाधव यांनीही अपक्ष म्हणून चाचपणी केली. इतर पक्षांच्याही संपर्कात असल्याच्या चर्चा होतच असतात. माजी खा.शिवाजी माने व माजी आ.गजानन घुगे यांचीही तीच परिस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा दोन्हीही हातच्या गेल्या. त्यातच हे दोघेही सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात होते. मात्र माजी आ.घुगे यांनी मला लोकसभेच्या चाचपणीसंदर्भात मातोश्रीचे बोलावणे आले होते. त्यात पक्षप्रवेशाचा कोणताच विषय नव्हता. आगामी काळातही विधानसभेची जागा ज्यांना मिळेल, त्याचेच काम करणार असल्याचे त्यांचे म्हणने आहे. माने मात्र अजूनही निवडणूक लढण्याच्या गंभीर मानसिकतेत आहेत. ती लढणार कशी? हे आगामी काळच सांगणार आहे.
दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीतून जागा गेली तरीही निवडणूक चाचपणी करणारा कोणी दिसत नाही. हिंगोलीत मागच्या वेळी काँग्रेसकडून लढून पराभूत झालेल्या माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दावा सोडलेला नसताना राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुते मात्र चाचपणी करताना दिसत आहेत. आता ही जागा सोडवून घेणे किती सोपे व किती अवघड हे कळायला मार्ग नाही. मात्र शिवसेना व भाजपइतकी काँग्रेस व राष्ट्रवादीतील गोची झालेल्यांची संख्या नाही.
काहींनी हाताने ओढवली परिस्थिती
मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षप्रवेश केलेल्या अनेकांना आगामी काळात युती व आघाडी झाल्यास आपले कसे होणार? याची पुसटशी कल्पना येवू नये, हे आश्चर्याचे वाटते. या सर्व प्रकारांची जाणीव असतानाही काहींनी केलेला पक्षप्रवेश आता अंगलट आल्याचे दिसून येत आहे.