खड्ड्यात गाडी अडकून फेकल्या गेल्याने एकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 03:54 PM2017-11-11T15:54:26+5:302017-11-11T15:57:08+5:30
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव - कनेरगाव नाका मार्गे जाणा-या रस्ताची रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था झाली आहे.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव - कनेरगाव नाका मार्गे जाणा-या रस्ताची रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था झाली आहे. प्रचंड प्रमाणात उखडलेल्या या रस्त्यावर काल रात्री अपघातात एकाच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
विकास दत्तात्रय पंडितकर (३४, रा. गोरेगाव) असे मृताचे नाव आहे. ते सेनगाव येथे ग्राम पंचायत कार्यालयात गट समन्वयक म्हणून कार्यरत होते. काल रात्री ते गोरेगाव - कनेरगाव या मार्गावरून दुचाकीवर प्रवास करत होते. रस्त्यावर वागदरा येथे आले असता रस्त्यावरील एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. आदला खूप जोरात बसल्याने विकास रस्त्याच्या कडेला फेकले गेले. फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व यातच त्यांचा मृत्यू झाला. विकास हे मागील आठवड्यातच वडील झाले होते व त्यांनी आपल्या बालकाचा चेहरा सुद्धा पाहिला नव्हता. यामुळे संपूर्ण परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
रस्त्याच्या कडेला अंधार असल्याने तिकडे रात्री येणा-या जाणा-यांचे लक्ष गेले नाही. त्यांच्या दुचाकीच्या एका बाजूचा लाईट सुरु होता. मात्र, अशात काही शेतकरी रबी पिकला रात्री पाणी देण्यासाठी शेतात येतात यामुळे गाडी पाहणा-याला गाडी एखाद्या शेतक-याने घाईत अशी लावली असेल असे वाटले. हा रस्ता वर्षानुवर्ष खराब आहे एका वर्षापूर्वीही याच ठिकाणी झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एक अपघाती मृत्यू याच ठिकाणी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक
रस्ता व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी आजवर ग्रामस्थांना आजवर केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. तसेच या मार्गावर पोलिसांची गस्त सुद्धा नाही यामुळेच विकास यांच्या अपघाताची माहिती दुस-या दिवशी मिळाली यामुळेही ग्रामस्थ संतप्त आहेत. दुरुस्ती प्रकरणी आ. तान्हाजी मुटकूळे यांनासुद्धा ग्रामस्थांनी साकडे घातले तरीही रस्ता जशास तसा आहे. यामुळे आता दुरुस्ती साठी आणखी किती जणांचा बळी जावा लागेल असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.