खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांसह शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 07:33 PM2018-08-01T19:33:34+5:302018-08-01T19:34:11+5:30
दोन शाळकरी मुले घराकडे परतत असताना रस्त्याजवळील खड्ड्यातील पाण्यात पडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यासह त्या दोघा मुलांचाही मृत्यू झाला.
आखाडा बाळापुर (हिंगोली ) : दोन शाळकरी मुले घराकडे परतत असताना रस्त्याजवळील खड्ड्यातील पाण्यात पडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यासह त्या दोघा मुलांचाही मृत्यू झाला. ही घटना आज संध्याकाळी कळमनुरी तालुक्यातील कवडी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कवडी येथील संभाजी प्रकाश पतंगे (१३ वर्षे ) व सुखदेव सुभाष राऊत ( १४ वर्ष) हे दोघे शाळेतून घराकडे जात होते. यावेळी रस्त्या लगतच्या खड्ड्यातील पाण्यात हात धुण्यासाठी गेलेल्या एकाचा तोल जाऊन तो खड्ड्यात पडला. हे पाहताच दुसराही त्याला वाचविण्यासाठी गेला असता तो ही खड्ड्यात पडला.
हा सर्व प्रकार येथून येणाऱ्या एका शाळकरी मुलाने पाहिला. तेव्हा त्याने आरडाओरड करून शेजारच्या शेतातील दत्तराव नामदेव पतंगे यांना मदतीसाठी बोलावून आणले. त्यांनी लागलीच पाण्यात उडी मारत दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघाही मुलांनी त्यांना घट्ट पकडल्याने त्यांचे पाय खड्ड्यातील गाळात रुतले. यातच तिघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली.