शहीद संतोष चव्हाण यांचे पार्थिव येण्यास विलंब झाल्याने ब्राह्मणवाड्यात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 04:19 PM2019-05-02T16:19:35+5:302019-05-02T16:28:10+5:30
मुख्यमंत्र्यांच्या श्रद्धांजलीसाठी विलंब होत असेल तर हे संवेदनशिलतेचे लक्षण आहे काय? असा संताप ग्रामस्थ व शहिदाचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.
औंढा नागनाथ /सिद्धेश्वर नंदगाव (हिंगोली ) : गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा जंगल परिसरात नक्षलवादी हल्ल्यात हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जवान संतोष देवीदास चव्हाण शहीद झाले आहेत. मात्र घटनेला चोवीस तास उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या श्रद्धांजलीसाठी विलंब होत असेल तर हे संवेदनशिलतेचे लक्षण आहे काय? असा संताप ग्रामस्थ व शहिदाचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.
१ मे रोजी गडचिरोलीत घडलेल्या घटनेत संतोष चव्हाण हे शहीद झाल्याची कोणतीच अधिकृत माहिती जिल्हा, तालुका वा पोलीस प्रशासनाकडून कुटुंबियांना मिळाली नाही. गडचिरोलीत पोलीस दलात असलेल्या एका नातेवाईक मुलीने शहिदाच्या नातेवाईकांना प्रथम याची माहिती दिली. कुटुंबियांना मात्र काल रात्री बाहेरच्यांनीच हे सांगितले. तर गावचे सरपंच व काहीजण प्रशासनाकडून कोणतीच माहिती येत नसल्याने औंढा पोलीस ठाण्यातही जावून आले. त्यानंतर पोलिसांनी गावात येवून पाहणी केली. मात्र काहीच माहिती दिली नाही.
शहीद जवानाचे वडील देवीदास चव्हाण हेही यापूर्वी एसआरपीएफ व स्थानिक पोलीस दलात सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनीही गडचिरोलीत सेवा बजावली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत संतोष यांनी पोलीस सेवा पत्करली. घटनेला चोवीस तास उलटूनही अजून कोणी साधी माहितीही दिली नसल्याची खंत देवीदास यांनी व्यक्त केली. तर यापूर्वी मीही गडचिरोलीत सेवा बजावली. पूर्वीपेक्षा आता तंत्रज्ञान प्रगत झाले तरीही सरकारला नक्षलवादाचा बिमोड करता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.