'येथील' ग्रामस्थ सहन करतात वर्षातील ७ महिने दुष्काळझळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:08 PM2018-04-19T20:08:48+5:302018-04-19T20:08:48+5:30
कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
आखाडा बाळापूर (हिंगोली ) : ‘नेमिचे येतो दुष्काळ’ ही म्हण तयार झालीय भुरक्याची वाडी या गावासाठी. १२ महिन्यातले सात महिने या गावावर पाण्याचं संकट येत असते. अर्धे वर्ष या गावातल्या ग्रामस्थांना दुष्काळझळा सहन कराव्या लागतात. गेल्या सात वर्षांपासून पाण्याच्या भीषण दुष्काळाचे दुष्टचक्र गावाला ग्रासून टाकते. दुष्काळ अंगवळणी पडावा, असे भीषण चित्र येथे आहे. एक विहीर, एक बोअर अधिग्रहीत करून पाण्याची तहाण भागविली जातेय. पण हा उपायही तोकडाच पडतोय. कारण बोअर लावला की, अधिग्रहीत विहिरीतील पाणी संपतं. भयाण चिंताग्रस्त वातावरणात ग्रामस्थ दुष्काळाशी सामना करत आहेत.
कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. चारी बाजूंनी डोंगराळ भाग आहे. पण पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणीपातळी खोल गेल्यामुळे विहिरी, बोअर आटले. ग्रा.पं.तर्फे केलेले बोअर डिसेंबर महिन्यातच आटतात. जेमतेम चार ते पाच महिने गावाला पाणी मुबलक प्रमाणात मिळते. डिसेंबरपासून ते जूनपर्यंत समस्त ग्रामस्थांना दुष्काळझळा सोसाव्या लागतात.
गेल्या सात वर्षापासून पाण्याचा दुष्काळ ग्रामस्थांना छळतोय. तब्बल अर्धे वर्षे पाण्याचा दुष्काळ सोसावा लागत असल्याने ग्रामस्थांना आता दुष्काळही अंगवळणी पडतो आहे. सध्या गावातील संजाबराव कोकरे व संतोष भुरडे यांचा एक विहीर व एक बोअर अधिग्रहित केले. यावर गावाची तहाण भागविण्याचा प्रयत्न केला जातो. मोटार लावली की पाणी संपते. त्यामुळे कधी पुन्हा पाणी जाईल याबाबतचा धसका ग्रामस्थांना आहे. तात्पुरती उपाययोजना करुन दिवस पुढे ढकलले जात आहेत. परंतु यावर कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही. प्रशासन कायम दुर्लक्ष करत असल्याने निश्चिय करून पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. जिवाच्या आकांताने लहाणापासून ते वृद्धांपर्यंत महिला पुरूष श्रमदानात सहभागी झाले.
पाण्याची पातळी वाढण्यासाठी कष्ट उपसत आहेत. गावच्या ललाटावरील दुष्काळ पुसून टाकण्यासाठी गाव झटत आहे. हे चित्र समाधानकारक असले तरी प्रशासन या आदिवासी बांधवांच्या चिंता मिटविण्यासाठी कधी पुढे येणार हा खरा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. अजूनही येथील अनेक कुटूंब या पाण्याला कंटाळून पर जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. तर अजून जाण्याच्या मार्गावर आहेत. गावात दर वर्षी राहते ती केवळ वयोवृद्ध मंडळीच. त्यांनाही अशा दुष्काळातच दिवस ढकलावे लागत आहेत. सर्व कामे सोडून ग्रामस्थांना पाण्याच्या प्रतिक्षेत बसावे लागत आहे. पहाटे दोन कधी तीन वाजता उठून डोळे चोळत रांगेत नंबर लावण्याची वेळ वर्षानुवर्ष कमी झालेली नाही, हे विशेष!
ग्रामस्थांचा दुष्काळाशी सामना
या गावाला नेहमीच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ कायम आहे. जे वर्ष निघेत ते सारखेच निघत आहे. ना कोणता प्रतिनिधी या गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. तर ना कधी कोणाता शासकीय अधिकारी गावात येऊन पाण्याचे नियोजन करण्यास सांगत नाही. त्यामुळे आपल दरवर्षी त्याच त्या भांड्याच्या रांगा लावून तासंतास ताटकाळत पाणी भरावे लागते. कधी - कधी तर पाणी भरता - भरता बोअरचे पाणी जात असल्याचाही अनुभव ग्रामस्थांना येत आहे. रांगेत थांबूनही पाणी मिळेच याची शाश्वती नाही.
पाण्यासाठी ग्रामस्थ हतबल
गेल्या सात वर्षापासून डिसेंबर नंतर पाण्याचा भीषण टंचाईला तोंड द्यावे लागते. पाण्याची उपलब्धता करण्यासाठी ग्रा.पं. प्रयत्न करते .पण पाणीच उपलब्ध होत नसल्याने सगळे प्रयत्न खुंटतात. अधिग्रहणाने सध्या पाणीपुरवठा होतो. पण हा स्त्रोत कधी बंद होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे परिस्थिती भीषण आहे. ग्रामस्थांना ही चिंता ग्रासते. सगळे या संकटापुढे हतबल आहेत.- सरपंच संतोष भुरके
वॉटरकप स्पर्धेतून पाणीपातळी वाढण्यासाठी झटत आहेत
गत सात वर्षापासून सातत्याने दुष्काळाशी दोन हात करत आहेत. यावर्षी वॉटरकप स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा म्हणजे संधी मानून आम्ही काम करतो. पाणी आडवून पाणी जिरवल आणि पाणीपातळी वाढली तर आमची पाण्याची समस्या सुटेल, यासाठी सगळे ग्रामस्थ झटून कामाला लागले आहेत.
- ग्रामसेवक माळोदे