दुष्काळाने उसापेक्षा वाढ्यालाच जास्त गोडी; चाराटंचाईमुळे पेंढीचे भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 02:25 PM2019-02-04T14:25:43+5:302019-02-04T14:26:38+5:30
शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही.
वसमत (जि. हिंगोली) : दुष्काळामुळे तालुक्यातील भूजल पातळी प्रचंड खालावली असून जलसाठे कोरडे पडल्याने सिंचन क्षेत्र घटले. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासह चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्यासाठी केवळ उसाच्या वाढ्यांचाच पर्याय शिल्लक असल्यामुळे वाढ्याच्या पेंढीचे भाव गगनाला भिडले आहेत. दहा रुपयांना पाच वाढ्यांची पेंढी येत आहे.
वसमत व औंढा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे . त्यातच शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही. हायब्रीड ज्वारीचा पेरा घटल्यामुळे चाऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. गतवर्षी कमीअधिक पाण्यामुळे सर्व शेतकरी आपल्या शेतात चारा पेरत असत. यंदा प्यायलाच पाणी नसल्याने शेतीसाठी पाण्याचा विचारही डोक्यात घेणे चुकीचे ठरत आहे. त्यामुळे यंदा चाऱ्याची समस्या अतिशय तीव्र बनली असून जवळपास दिवाळीपासूनच चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस तोडणीचा हंगाम असल्यामुळे ऊसतोड कामगार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून वाढे सहजपणे घेऊन बाजारात विकत आहेत. तेच वाढे पंधरा रुपये पेंढी या दराने खरेदी करण्याची वेळ पशुपालकांवर आल्याने उसापेक्षाही वाढ्यांची गोडी वाढली आहे.
वसमत शहरातून विक्री होणारे वाढे पूर्णा सहकारी साखर कारखाना, बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना आणि भाऊराव सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखाने अंतर्गत होणाऱ्या ऊस तोडीतून येत आहेत. दररोज आठशे ते नऊशे वाढ्यांच्या पेढ्यांचे चार ते पाच टेम्पो दाखल होत आहेत. याशिवाय बैलगाडीत जवळपास दररोज ७00 ते ८00 पेंढ्या वाढे विक्रीसाठी येतात.