उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 06:02 AM2019-07-19T06:02:12+5:302019-07-19T06:02:26+5:30
ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढून सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
सेनगाव : सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारी अशा दुष्टचक्रात सापडलेल्या ताकतोडा (ता. सेनगाव) येथील ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढून सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा (ता. सेनगाव) हे सुमारे हजार-बाराशे लोकसंख्येचे गाव. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन. तीही कोरडवाहू. दुष्काळ त्यांच्या पाचवीला पुजलेला. पावसाच्या चार थेंबांवर आलेल्या कपाशी, सोयाबीनवर वर्षभराची गुजराण अवलंबून. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही. यंदाही जुलै महिना संपत आला तरी पावसाच्या थेंबाची आणि मातीची गाठभेट झालेली नाही. परिणामी पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. मागच्या वर्षात गंभीर दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अद्यापही मिळाला नाही. बँकांच्या आडमुठ्या धोरणांमुळे पीककर्जापासूनही शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे खासगी फायनान्स व सावकाराकडे गहाण पडले आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक ग्रामस्थ व युवक कामाच्या शोधात महानगराकडे वळले आहेत. मात्र ताकतोडा येथील ग्रामस्थांनी भुईच्या ओढीने गाव अद्याप सोडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, पीकविमा, खासगी फायनान्स व सावकाराकडील कर्ज माफ करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी १८ जुलै रोजी सेनगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागण्या मान्य कराव्यात, अथवा आम्हाला इच्छामरणाची व गाव विकण्याची परवानगी द्यावी, असा त्यांचा आग्रह आहे.
>...तोपर्यंत शाळा, कार्यालये बंद!
जोपर्यंत मागन्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत गावातील शासकीय कार्यालये व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर ‘मुख्यमंत्री साहेब, आमचे गाव शेतजमिनीसह विकत घ्या’ असा उल्लेख करण्यात आला आहे.