अपूरी क्षमता असल्याने ऐनवेळी बदलले परीक्षा केंद्र; वसमतमध्ये परीक्षार्थींची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:12 PM2020-02-18T17:12:55+5:302020-02-18T17:18:12+5:30
तात्पुरते परीक्षा केंद्र देण्यात आले होते. त्या शाळेला सुद्धा दोन दिवसापुर्वी कोणतीही सूचना नव्हती.
वसमत : बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वसमतमध्ये परीक्षा मंडळाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय वसमतमध्ये आला. परीक्षा केंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी दिल्याने ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलण्याची वेळ वसमतमध्ये आल्याने परीक्षार्थी प्रचंड तारांबळ उडाली. एकाच पेपर पुरते हे तात्पुरते उपकेंद्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षा केंंद्र देण्यापुर्वी परीक्षा मंडळाकडून केंद्रासंदर्भातील सर्व माहिती घेवूनच परीक्षा केंद्र देणे अपेक्षीत असते. विद्यार्थ्यांची असून व्यवस्था व अन्य क्षमता तपासून परीक्षा केंद्र दिले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर संबंधीत परीक्षा केंद्राचे नाव व परीक्षा केंद्र क्रमांकही दिलेला असतो. प्रवेश पत्रावरील परीक्षा केंद्र गृहीत धरुन विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी सरळ परीक्षा केंद्रावर जातात. वसमत शहरात केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्र. ८२८ हे एक केंद्र देण्यात आले होते.
परीक्षा मंडळाने या केंद्रावर ६८८ परीक्षार्थी परीक्षा देतील असे नियोजन केले होते. प्रत्यक्षात या केंद्राची आसन व्यवस्था व क्षमता तेवढी नव्हती. महाविद्यालयाच्या वतीने परीक्षा मंडळाला ही अडचण सांगण्यात आली होती. मात्र बोर्डाने कोणतीच हालचाल या बदल केला नाही. महाविद्यालयाच्या वतीने सतत पाठपुरावा केल्यानंतर तीन दिवसापुर्वी परीक्षा मंडळाने अतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी जवळच्या शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्याची सूचना दिली. त्यानंतर केब्रीजच्या जवळ एक किलोमिटरच्या अंतरात असलेल्या सिद्धेश्वर शाळेची निवड करून तेथे अतिरिक्त २४७ विद्यार्थ्यांसाठी एका विषयापुरते परीक्षा केंद्र म्हणून वापरण्याचे ठरले. दरम्यान विद्यार्थ्यांपर्यंत ही सूचना पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे झालेच नाही.
कागदोपत्री पुर्तता करून एक केंद्र व दुसरे त्यांचे उपकेंद्र असे दोन जागी परीक्षा केंद्र झाले. आज विद्यार्थी जेव्हा परीक्षा देण्यासाठी केंद्रावर येणे सुरू झाले. तेव्हा परीक्षा केंद्र येथे नसून सिद्धेश्वर येथे असल्याचे समजल्याने विद्यार्थी व पालक चक्रावून जात होते. धावत पळत परीक्षा केंद्र गाठवण्याची लगबग सुरू झाल्या. केब्रीज महाविद्यालयापासून कोणताही अॅटो व अन्य वाहन मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे वाहन नसणाºया परीक्षार्थ्यांना वाहन त्रास सहन करावा लागला. परीक्षा मंडळाच्या नियोजनाचा अभाव व गलथान कारभाराचा हा कहर समजल्या जात आहे. केब्रिज महाविद्यालयातील २४७ परीक्षार्थ्यांसाठी फक्त इंग्रजीच्या पेपर पुरतीच तात्पुरती सोय सिद्धेश्वरमध्ये करण्यात आलेली होती. आता अन्य पेपर केंब्रीजमध्येच होणार आहेत.
ज्या सिद्धेश्वर विद्यालयात तात्पुरते परीक्षा केंद्र देण्यात आले होते. त्या शाळेला सुद्धा दोन दिवसापुर्वी कोणतीही सूचना नव्हती. दोन दिवसापुर्वी व्हॉटअप्द्वारे सूचना मिळाली. त्यामुळे आज सिद्धेश्वर विद्यालयाला सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना हजेरी घेवून सोडावे लागले तर दुपार सत्राच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागली. या संदर्भात केंब्रीज महाविद्यालयाचे प्राचार्य जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही परीक्षा मंडळाला केंद्राची क्षमता व आसन व्यवस्था याबद्दल अगोदरच कळवले होते. परीक्षा मंडळाच्या चुकीनेच आमच्या केंद्रावर ज्यादा परीक्षार्थी देण्यात आले होते. फक्त एका पेपरपुरते तात्पुरते परीक्षा केंद्र देण्यात आले होते.
या केंद्रावर २४७ परीक्षार्थ्यांना परीक्षा देण्याची सोय करण्यात आली. उर्वरीत पेपर केंब्रीजमध्येच होतील, असे त्यांनी सांगितले. केंद्रातील बदलाबदल स्थानिक वर्तमानपत्रात सूचना देवून बोर्डावर सूचनापत्रक लावल्याचेही त्यांनी सांगितले. सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बल्लमखाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षा मंडळाने दोन दिवसापुर्वी व्हॉटसअपवर पत्र पाठवून इमारत उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. बारावी सारख्या परीक्षेत बोर्डाच्या वतीने योग्य नियोजन व खबरदारी घेण्याचे सौजन्य दाखवले जात नसल्याचाच प्रकार यानिमित्ताने पहावयास मिळाला.