औषधांच्या तुटवड्यामुळे आता नियंत्रण समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:43+5:302021-04-27T04:30:43+5:30
पाटील म्हणाले, एफडीएचे मरेवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे यांची समिती आता औषधींचा साठा किती लागणार आहे त्याच्या ...
पाटील म्हणाले, एफडीएचे मरेवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे यांची समिती आता औषधींचा साठा किती लागणार आहे त्याच्या नियोजनासाठी काम करणार आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे रेमडेसिविरच्या योग्य वापरावर वॉच ठेवतील. ज्या रुग्णांना हे इंजेक्शन दिले त्यांची छायाचित्रे पाठवावी लागणार आहेत. शिवाय ऑक्सिजनची १० मेट्रिक टनाचे नियतन मंजूर झाले असून आणखी दहा टनाचे मंजुरीत आहे. वसमत, कळमनरीत ५ तर औंढा व सेनगावला२ टनांचे टँक मंजूर होणार आहेत. जिल्हा नियोजनचा ३० टक्के निधी म्हणजे जवळपास ४८ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे यातून २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १४ लाख याप्रमाणे २४ रुग्णवाहिकांसाठी मंजूर झाले. पंधरा दिवसांत त्या मिळतील. याशिवाय हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांनी आपापल्या स्थानिक विकास निधीतून २ कार्डियाक रुग्णवाहिकांसाठी पत्र दिले. तर औंढा, बाळापूर व सेनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवे कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. तर कळमनुरीत हिंगोलीतील ९ फिजिशियनच्या ड्युटीज लावून २० व्हेंटिलेटरचा वापर सुरू करण्यास सांगितले असल्याचेही ते म्हणाले.
आरटीपीसीआरची नवीन मशीन आली. मात्र, ती नादुरुस्त आहे. नवीन मशीन येत आहे. ती आल्यावर रोज १२०० चाचण्या करणे शक्य आहे. तर लसींचाही ११२०० एवढा साठा मिळणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास १ लाख व तहसीलला १५ लाखांचा राखीव निधी दिला जाईल. यात काही नगरपालिकांनाही देण्यासाठी सूचना दिल्या जातील. डॉक्टर व परिचारिकांची भरती सुरू असून लवकरच नवे मनुष्यबळही उपलब्ध होईल.
यावेळी आमदार संतोष बांगर यांनी जिल्हा रुग्णालयातील औषधी खासगीत चालली असून त्याला चाप बसावा. तसेच अजूनही रेमडेसिविर इंजेक्शन तीस तीस हजारांना विकणारे महाभाग असून त्यावर कारवाईची मागणी केली. तर एचआरसीटी अहवालात जास्त स्कोअर असलेल्यांवर तत्काळ कोरोनाचे उपचार सुरू करावे. ते न केल्यामुळे रुग्णांची स्थिती वाईट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टरांचे लोकेशन रोज तपासणार
डॉक्टर ड्युटी न करता दांड्या मारत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी प्रत्येकाला रोज दिवसातून चार वेळा आपले लोकेशन पाठविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे दांड्या मारणे थांबेल. तरीही कुणी असे केल्यास थेट कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाणार आहे.