वंचितमुळे आघाडीसह युतीही बेजार! हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस
By विजय पाटील | Published: April 19, 2024 05:59 AM2024-04-19T05:59:22+5:302024-04-19T05:59:24+5:30
भाजपचे बंड, महाविकास आघाडीतील कलह या कारणांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला.
विजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली: भाजपचे बंड, महाविकास आघाडीतील कलह या कारणांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला. त्यातच वंचितचा उमेदवार महायुती व महाविकास आघाडी दोघांनाही फटका देत असल्याने दोन्हींकडील मंडळी बेजार असल्याचे चित्र आहे. तब्बल ३३ उमेदवार येथे रिंगणात आहेत. महायुतीचे बाबूराव कदम, महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, वंचित बहुजन आघाडीचे बी.डी. चव्हाण यांच्यात चुरस आहे. महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारीवरून असलेले ताणतणाव आता प्रचारातही दिसत आहेत.
शिंदेसेनेचे विद्यमान खा. हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या विरोधामुळे कापली गेली. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी दिल्याने ते तिकडेच गुंतले. तर कदम यांना मित्रपक्षांची म्हणावी तशी साथ अजूनही मिळत नाही. मविआचे नागेश आष्टीकरांनाही याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्वपक्षासह मित्रपक्षातील नाराजी संपत नसल्याचे दिसत आहे. वंचितच्या प्रचाराची गती संथच आहे.
पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत
- हिंगोलीत आतापर्यंत शिवसेनेची काँग्रेस अथवा राष्ट्रवादीशी लढत होत आली आहे. येथे फक्त एकदाच भाजप लढली. त्यानंतर कायम शिवसेनेचाच उमेदवार राहिला. मात्र यावेळी शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गट आमने सामने आले आहेत.
- युतीत भाजप तर आघाडीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर दिसत आहे. यात उमेदवारांना आपली स्वतंत्र यंत्रणा मैदानात - उतरवून प्रचार करावा लागत आहे.
- दर पाच वर्षांनी वेगळा कल देणारा तीन जिल्ह्यात विस्तारलेला हा मतदारसंघ यावेळी कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
हिंगोली जिल्हा हा ना उद्योग जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. यात स्थलांतरामुळे गावेच्या गावे ओस पडतात.
हळद संशोधन केंद्र उभे राहणार असले तरीही दुसरे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगांबाबत नुसतीच आश्वासनांची खैरात आहे.
शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा अभाव असून यासाठी इतर जिल्ह्यांत जावे लागते. त्याचा मोठा आर्थिक फटका प्रत्येक कुटुंबाला सोसावा लागतो.
एकूण मतदार १८,१७,७३४
पुरुष - ९,४६,६७४
महिला - ८,७१,०३५
गटातटाचा फटका नेमका कुणाला?
- महायुतीत भाजप नेत्यांची नाराजी दूर झाली, पण कार्यकर्त्यांची झाली नाही. शिवाजी जाधव या भाजप बंडखोराने उमेदवारी कायम ठेवली आहे. अजित पवार गटही अंतर ठेवूनच जमेल तशी ताकद लावत आहेत.
- मविआत हिंगोली जिल्ह्यातला उमेदवार हवा म्हणणाऱ्यांनी अजूनही प्रचारात जीव ओतला नाही. एक दोन नेते वगळता इतरांनी प्रचाराकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
हेमंत पाटील शिवसेना(विजयी) ५,८६,३१२
सुभाष वानखेडे काँग्रेस ३,०८,४५६
मोहन राठोड वं.बहुजन आघाडी १,७४,०५१
संदेश चव्हाण अपक्ष २३,६९०
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
२०१४ राजीव सातव काँग्रेस ४,६७,३९७ ४८.५९
२००९ सुभाष वानखेडे शिवसेना ३,४०,१४८ ४१.६१
२००४ सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी ३,२७,९४४ ४५.०२
१९९९ शिवाजी माने शिवसेना २,९७,२८४ ४३.७७
१९९८ सूर्यकांता पाटील काँग्रेस ३,४५,४३९ ५१.४३