अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान
By विजय पाटील | Published: November 28, 2023 07:28 PM2023-11-28T19:28:20+5:302023-11-28T19:30:10+5:30
गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी, अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे.
हिंगोली : रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील साखरेची पोती पाण्याखाली आली. त्यामुळे साखरेचे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.
वसमत तालुक्यात २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान अचानक जोरदार पाऊस झाला. यावेळी अवकाळी मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापाठोपाठ कापूस, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. अवकाळी पावसाने साखरेच्या गोडाऊनमधील अंदाजे ५०० मे.टनाच्या जवळपास साखर भिजली आहे. पाऊस सुरू झाला तेव्हा गोडाऊनमध्ये पाणी साचेल असे वाटले नव्हते; परंतु जोराचा पाऊस असल्यामुळे गोडाऊनमध्ये पाणीच पाणी झाले. अवकाळी पावसामुळे कारखान्यात मोठे नुकसान झाले.
गाळप पूर्ववत चालू करण्यासाठी अंदाजे २४ तास लागले आहे. अवकाळी पावसामुळे कारखान्याचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे. पुढील चार ते पाच दिवस कारखाना पूर्ण गाळप क्षमतेने चालविण्यास अडचण येणार आहे. ज्या गतीने ऊसतोडणी होत होती ती अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी थांबली असल्याने कारखान्याचे गाळप काही दिवस थांबणार असल्याचे सांगण्यात आले. साखर ज्या गोडाऊनमध्ये ठेवली आहे त्या गोडाऊनमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे साखर पाण्यात भिजली गेली आहे.
गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी...
अवकाळी पावसामुळे कारखान्याच्या गोडाऊनमध्ये असलेली साखरेची पोती भिजली गेली. यामध्ये ५०० मेट्रिक टन साखर होती. या अवकाळी पावसामुळे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- सुनील दळवी, कार्यकारी संचालक, ‘पूर्णा’ कारखाना