पाईपलाईनसाठी खोदले रस्ते; दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:59 PM2019-05-07T23:59:55+5:302019-05-08T00:00:43+5:30
वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरती दुर्दशा झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरती दुर्दशा झाली आहे.
शहरात पाईपलाईन अंथरली जाणार हे माहित असतानादेखील नगरपालिकेने गल्लोगल्ली पेवर ब्लॉकच्या रस्त्यांसाठी शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा केला. गुत्तेदारांनी बिले उचलली. अनेक भागात पेवर बलॉकचे रस्ते झाले. आता नियोजित पाईपलाईनसाठी नव्याने झालेले रस्ते पुन्हा खोदल्या जात आहेत. काही भागात तर खोदलेल्या रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. या प्रकाराकडे लक्ष देण्यास कोणी तयार नाही. असा अजब कारभार पहावयास मिळत आहे. रस्ते खोदताना कोणीही तांत्रिक माहिती असलेले अधिकारी हजर राहत नाहीत. मजुरच वाटेल तसे खोदकाम करत आहेत. मजुरच पाईपलाईन पुरतात व निघून जातात. खोदलेले रस्ते पूर्ववत करावे लागतात याचाच नगरपालिकेला विसर पडलेला दिसतो. पाईपलाईनचे काम करणाऱ्या गुत्तेदाराकडे रस्ते पूर्ववत करुन देण्याचे काम अपेक्षित असते. मात्र तसे होताना दिसत नाही. वसमत शहरातील गल्लीबोळात पाईपलाईन होणार हे माहीत असतानादेखील रस्ते का केले? आता रस्त्याची तोडफोड होत असल्याने हा निधी वाया गेल्याने याला जबाबदार कोण, याची चौकशी कराण्याची सध्या मागणी नागरिकांतून केली जात आहे. मात्र नगरपालिकेच्या या अजब कारभाराची चौकशी करणारी यंत्रणाच अस्तीत्वात नसल्याचे चित्र आहे.
पेव्हर ब्लॉक रस्ते तयार करुन गुत्तेदाराची बिले काढली. आता पुन्हा पेवर ब्लॉकची रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्या जात असल्याने पेव्हरब्लॉकची दुरवस्था झाली. आता पुन्हा रस्त्यावर पेव्हरब्लॉक राहणार की खड्डे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.