दिवाळी काळात परगावांतून येणारे नागरिक वाढले, टेस्ट तेवढ्याच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:24 PM2020-11-21T17:24:16+5:302020-11-21T17:25:52+5:30
टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यात नागरिक जशी काळजी घेत होते, तशी आता घेतली जात नसल्याचे दिसत आहे.
हिंगोली : जिल्ह्यात दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने इतर जिल्ह्यातून परतले. मात्र या काळात कोरोनाचा कहर कमी झाला होता. त्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्यांनी चाचणी करून घरी परतणे अपेक्षित असताना तसे काहीच झालेले दिसले नाही. त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यातही नियमितएवढ्याच चाचण्या झाल्याचे आढळून आले.
हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यात नागरिक जशी काळजी घेत होते, तशी आता घेतली जात नसल्याचे दिसत आहे. टाळेबंदीच्या काळात परजिल्ह्यातून आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक बनले होते. दिवाळीला मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी हा सण साजरा करण्यासाठी परतले होते. त्यात अनेक जण पुणे, मुंबई यासारख्या महानगरातून आलेले आहेत. या ठिकाणी पूर्वीही कोरोनाचा मोठा उद्रेक होता. तर आता त्यात घट झाली तरीही कोरोनाची रुग्णसंख्या त्या मानाने बरीच आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्यांनी काळजी म्हणून तरी चाचणी करून घेणे अपेक्षित होते. मात्र तसे होताना दिसत नव्हते. त्यातच नियमितपणेही कोरोनासदृश्य लक्षणे असताना अनेक जण दिवाळीचा सण तोंडावर असल्याने ही चाचणी टाळताना दिसत होते. आता दिवाळी संपल्याने पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात आजारी पडल्याचे समजून अनेकजण जातानाही कोरोना चाचणी टाळणार असल्याचेच दिसत आहे. एरवी रेल्वे व बसेसला गर्दी दिसत नव्हती. आता ती दिसत आहे. मात्र हा प्रवास कोणतीही चाचणी न करताच सुरू असून कोरोनाबाबतचे गांभीर्य संपत चालले आहे.
कोविड ओपीडीमध्ये टेस्टींगसाठी प्रतिसाद नाही
दिवाळीच्या काळात गावाकडे परतलेल्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची अँटीजन चाचणी अथवा आरटीपीसीआर चाचणी करून घेतली नाही.n जिल्हा व तालुका स्तरावर असलेल्या या यंत्रणांच्या ठिकाणी कोणतीच गर्दी दिसत नव्हती. एवढेच काय तर आरोग्य विभागानेही या दृष्टिकोनातून काही नियोजन केले नव्हते. ज्यांना लक्षणे वाटत होती, अशांनी केलेल्या चाचण्या तेवढ्या झाल्या.
सध्या आपल्याकडे आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा झाली. त्यामुळे चाचण्या वाढल्या. अँटीजनही केली जाते.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक