डेंग्यूच्या आजाराने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:38 AM2018-10-26T00:38:48+5:302018-10-26T00:39:01+5:30
शहरातील मिलिंद कॉलनी परिसरातील शशिकला करण शिरपले (३७) या महिलेचा डेग्यूंच्या आजाराने मुत्यू झाल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली.
हिंगोली : शहरातील मिलिंद कॉलनी परिसरातील शशिकला करण शिरपले (३७) या महिलेचा डेग्यूंच्या आजाराने मुत्यू झाल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली.
शशिकला शिरपले यांना मागील आठ दिवसांपासून ताप येत होता. प्रथम त्यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतला. यादरम्यान त्यांना डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर महिलेस उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी दाखल केले. येथील डॉक्टरांनी दोन दिवस उपचार केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना नांदेडला हलवावे, असे पत्र रूग्णालयातून देण्यात आले. महिलेच्या नातेवाईकांनी बुधवारी नांदेडच्या रुग्णालयात हलविले. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यानंतर महिलेच्या तपासण्या केल्या. परंतु उपचार होऊ शकत नाहीत, असे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. नंतर खाजगी, शासकीय रुग्णालयांचा फेरा करता-करता २४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या या महिलेचा डॉक्टरांच्या वेळकाढू धोरणामुळे व योग्य उपचार न मिळाल्याने अखेर मृत्यू झाला.