अपमानास्पद वागणुकीचे कथन करताना डीवायएसपी पाटील यांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:14 PM2018-03-26T18:14:38+5:302018-03-26T18:19:03+5:30
प्रवासादरम्यान आॅटोलचाकांचा उद्धटपणा व निष्क्रीय पोलीस कर्मचार्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. आज हिंगोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली.
हिंगोली : मुंबई येथे आॅटोचालक व पोलिसांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे डीवायएसपी सुजाता पाटील यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यांना प्रवासादरम्यान आॅटोचालकांचा उद्धटपणा व निष्क्रीय पोलीस कर्मचार्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. आज हिंगोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली. या धक्कादायक व अपमानास्पद अनुभवाचे कथन करताना त्यांचे डोळे पाणावले होते.
हिंगोली येथे कार्यरत डीवायएसपी सुजाता पाटील भोपाळ येथे ट्रनिंगसाठी गेल्या होत्या. आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येत पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी मुंबई येथे २४ मार्चला त्यांच्या सोबत झालेल्या अपमानास्पद घटनेची माहिती 'लोकमत' प्रतिनिधीला दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनिंग संपवून त्या पंजाब मेलने भोपाळवरुन १७ तास प्रवास केल्यानंतर २४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता अंधेरी येथे आल्या. यावेळी त्यांच्या पायास दुखापत झाली होती. स्टेशनवर येताच त्यांनी आॅटोचालकास घरी नेऊन सोडण्यास सांगितले. परंतु एकाही आॅटोचालकांनी त्यांना प्रतिसाद न देत उलट त्यांची टिंगल उडविली. त्यामुळे पाटील यांनी परिसरातच काही अंतरावर असलेल्या पोलिसांना मदत मागितली. त्यांना पायास दुखापत असल्याचेही सांगितले. परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांची मुजोरी पाहून पाटील चांगल्याच भांबावून गेल्या.
यानंतर रिक्षाचालकावर कारवाई ऐवजी पोलीस कर्मचार्यांनी त्यांनाच चौकीत बोलावले. यावेळी त्यांनी, " आपली लहान मुलगी घरी तापाने फणफणत आहे, त्या रिक्षावाल्यांना मला घरी नेऊन सोडायला सांगा " अशी विनवणी केली. परंतु, त्यांच्या विनवणीकडे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे डीवायएसपी पाटील यांनी त्या पोलीस अधिकारी असल्याची ओळख दिली नाही. सर्वसामान्यांना चौकीत कशी वागणूक दिली जाते, हे त्यांना बघायचे होते. या अनुभवाने त्यांना चांगलाच धक्का बसला. यानंतर हा अनुभव त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला. दरम्यान, आपल्याच विभागातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना मिळालेल्या वागणुकीने हादरलेल्या पोलीस विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अनुभव कथन करताना झाल्या भाऊक
या सर्व घटनेचा तपशील दिल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. स्वतः सोबत घडलेल्या या धक्कादायक व अपमानास्पद अनुभवाचे कथन करत असताना त्यांचे डोळे पाणावले होते.