हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का; ३.५ रिश्टर स्केलची नोंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:25 AM2023-11-20T08:25:27+5:302023-11-20T08:25:55+5:30
या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
- इस्माईल जहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व औंढा या तीन तालुक्यांतील अनेक गावांत २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ९ मिनिटाला भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
वसमत तालुक्यातील पांगरा ( शिंदे) येथे २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी भूगर्भातून आवाज झाला. यावेळी लोक खडबडून जागे झाले आणि रस्त्यावर आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे. यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२:०४ वाजेदरम्यान भुगर्भातून मोठा आवाज आला होता. यावेळीही लोक रस्त्यावर येत रात्र जागून काढली होती.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचे केंद्र सांगितले जात आहे. वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा येथेही भूकंपाचा धक्का जाणवला आहे. गत ६ वर्षापासून जमिनीतून आवाज येत भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ जुलै रोजी ७:०५ व ७:१५ वाजेदरम्यान असे दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते.