वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; जमिनीतून आला गूढ आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 05:08 PM2023-12-16T17:08:29+5:302023-12-16T17:09:15+5:30
पांगरा शिंदेसह परिसरात मागील सहा वर्षांपासून गूढ आवाजासह अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
- इस्माईल जाहगीरदार
वसमत (जि. हिंगोली):तालुक्यातील पांगरा शिंदेसह परिसरात १६ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यादरम्यान भूगर्भातून गूढ आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या भूकंपाची नोंद झाली नसली तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दुजोरा दिला आहे.
पांगरा शिंदेसह परिसरात मागील सहा वर्षांपासून गूढ आवाजासह अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असून, यापूर्वी १५ जुलै रोजीही दोन वेळा तर नोव्हेंबर महिन्यातही दोन वेळा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर १६ डिसेंबरच्या दुपारी भूगर्भातून गूढ आवाज आला आणि जमीन हादरली. या भूकंपात नुकसान झाले नाही. यापूर्वी झालेल्या भूकंपाचे केंद्र पांगरा शिंदे होते. त्यामुळे या भूकंपाचे केंद्रही पांगरा शिंदेच असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.
ग्रामस्थांत भीतीचे वातावरण...
पांगरा शिंदे परिसरात मागील सहा वर्षांपासून अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. तसेच भूकंपाचे धक्केही जाणवत आहेत. यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने याचा शोध लावणे गरजेचे आहे.
- भागवत शिंदे, उपसरपंच, पांगरा शिंदे