हिंगोलीत पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के; भीतीने नागरिक आले घराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 09:14 AM2021-07-11T09:14:39+5:302021-07-11T09:15:49+5:30
वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
हिंगोली: जिल्ह्यातील नांदापूर व कुरुंदा परिसरात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे धक्के यावेळी हिंगोली शहरापर्यंत जाणवले. तसेच नांदेड येथेही हा धक्का जाणवला. वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मात्र रविवारी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी बसलेला धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता. कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, पोत्रा, वारंगा फाटा, दांडेगाव, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव या परिसरात हे धक्के जाणवले. सांडस परिसरातही दोनदा आवाज झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूगर्भातून मेघगर्जनेसारखा आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वसमत शहरासह तालुक्यातील पांगरा शिंदे, कवठा, कुरुंदा, बोराळा, खुदनापूर, किनोळा, बोरगाव या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लातूर येथील भूकंप मापक केंद्राशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे अजून नुकसानाची नोंद नसून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.
औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके आणि इतर गावांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत यावेळी पहिल्यांदाच हिंगोली शहरात धक्का जाणवल्याने अनेक जन याबाबत फोनवर विचारना करताना दिसत होते. तसेच नांदेड च्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.