खाद्यतेल केवळ ५ रुपयांनी स्वस्त; आता चमचमीत खा मस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:57+5:302021-09-27T04:31:57+5:30
हिंगोली : सप्टेंबर महिन्यात खाद्यतेलाच्या दरामध्ये काहीअंशी म्हणजे ५ रुपयांनी घसरण झाली आहे. दर कमी झाल्यामुळे दसरा, दिवाळीत चमचमीत ...
हिंगोली : सप्टेंबर महिन्यात खाद्यतेलाच्या दरामध्ये काहीअंशी म्हणजे ५ रुपयांनी घसरण झाली आहे. दर कमी झाल्यामुळे दसरा, दिवाळीत चमचमीत पदार्थ करून खाता येतील, असे दिसते; परंतु मोठे सण पाहता तेलाचे दर अजून कमी होणे आवश्यक आहे; पण शासन मात्र खाद्यतेलाच्या बाबतीत दुर्लक्षच करत आहे.
महागाईने कळस गाठला असून ऑगस्ट महिन्यात सोयाबीन १५० रुपयांस लिटर विकले गेले असून सप्टेंबर महिन्यात १४५ रुपये लिटर विकल्या जात आहे. ऑगस्टमध्ये सूर्यफूल १६० तर सप्टेंबर महिन्यात १५५, शेंगदाणा तेल ऑगस्टमध्ये १६५ तर सप्टेंबर महिन्यात १५५ रुपयांस लिटर विकल्या जात आहे. दसरा, दिवाळी हे मोठे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. दिवाळीला तेलाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जात असल्यामुळे शासनाने सर्वच खाद्यतेलाचे दर कमी करणे आवश्यक आहे.
किराणा खर्चात बचत...
खाद्यतेलाचे दर कमी झाले नसल्यामुळे किराणा खर्चात बचत करावी लागत आहे. मोठे सण तोंडावर असून या दिवसांमध्ये शेवया, चकल्या, मोठी पापडी, छोटी पापडी आदी पदार्थ लेकरांना करून द्यावे लागतात; परंतु महागाईने कळस गाठला आहे.
-सुरेखा कल्याणकर, गृहिणी
खाद्यतेल घ्यायचे म्हणून किराणा सामानातून इतर वस्तू कमी कराव्या लागतात. दीपावलीत दिव्यासाठी तिळाचे तेल आवर्जून वापरले जाते; परंतु तिळासोबत तेलाचेही दर कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवाळीत दिवा कसा लावावा? हा प्रश्न आहे.
-शीतल गायकवाड, गृहिणी
प्रतिक्रिया...
केंद्र शासनाने खाद्यतेलावरील कर कमी केल्यामुळे सद्य:स्थितीत तेल पाच रुपयांनी कमी झाले आहे. येत्या दसरा, दिवाळी सणाला खाद्य तेल महागले जाते की कमी होते, हे आज तरी सांगता येत नाही.
-प्रशांत गुंडेवार, किराणा व्यापारी
सोयाबीन
ऑगस्ट १५०
सप्टेंबर १४५
सूर्यफूल
ऑगस्ट १६०
सप्टेंबर १५५
शेंगदाणा
ऑगस्ट १६५
सप्टेंबर १५५
पामतेल
ऑगस्ट १३५
सप्टेंबर १३०
मोहरी
ऑगस्ट १७५
सप्टेंबर १७०
तीळ
ऑगस्ट २५०
सप्टेंबर २४०