विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:26 AM2018-11-18T00:26:26+5:302018-11-18T00:27:24+5:30
कामाच्या शोधात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कामाच्या शोधात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले. स्थलांतरित होणा-या मुलांना शिक्षण हमीकार्ड दिले जाणार आहे. सदर कामाचा अहवाल गट शिक्षणाधिकाºयांनी २७ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे.
शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसंदर्भात सूचनाही आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ मध्ये जे कुटुंबिय स्थलांतरित होत आहेत, त्यांच्या मुलांना मूळ गावी बालरक्षकामार्फत रोखून शिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु काही कारणास्तव पालकांसोबत मुले स्थलांतरीत होत असतील, तर त्या मुलांना शिक्षण हमी कार्ड व प्रगती नोंद पत्रक दिले जाणार आहे. जेणेकरून स्थलांतरित मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. ही मुले ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील किंवा जिल्ह्यात अशाप्रकारे स्थलांतरित होऊन आली आहेत. त्यांना हमीपत्राच्या आधारे थेट जवळच्या शाळेत प्रवेशित केले जाणार आहे. स्थलांतरित बालकांच्या शिक्षणाच्या प्रश्नाकडे बालरक्षक लक्ष केंद्रित करणार आहेत.
जे पालक स्थलांतरीत होत आहेत, त्यांच्या मुलांना मुळगावी रोखून बालरक्षकामार्फत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये बालरक्षकाची चळवळ गतिमान करून मुले स्थलांतरीत होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबधित यंत्रणेस मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाºयांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर अहवाल संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांनी तात्काळ म्हणजेच २७ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना आहेत.
शिक्षण विभागातर्फे बालरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी १८०, वसमत ८४, औंढा नागनाथ ८२ तर हिंगोली ५०, सेनगाव ५० अशी तालुकानिहाय बालरक्षकांची आकडेवारी आहे.