‘त्या’ आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:57 PM2018-05-28T23:57:24+5:302018-05-28T23:57:24+5:30
येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील ८ आरोपींना २८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध मोहीम पथकाकडून सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील ८ आरोपींना २८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध मोहीम पथकाकडून सुरू आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरती घोटाळ्याचे बिंग फुटले अन् याप्रकरणी ३ अधिकारी-कर्मचारी, एसएसजी कंपनीचे आॅपरेटर व २० उमेदवारांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील सहा आरोपी उमेदवार व दोन आॅपरेटर एकूण ८ जणांना अटक केली होती. अटक केलेल्या या आठही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. २३ मे रोजी आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले. या सहा आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने तपासकामी वाढ केल्याने २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले होते. सोमवारी पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. आॅपरेटर शिरीष अवधूत, स्वप्नील साळुंके व इतर सहा जणांचा यात समावेश आहे. पथकाला सापडलेल्या पुराव्याच्या सहाय्याने तपास मोहीम सुरू असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली. आतापर्यंत उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तसेच व्हीडिओ रेकॉर्डिंगही जप्त करण्यात आली आहेत.