निवडणूक गावात अन् प्रचारक मात्र तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:17 AM2021-01-13T05:17:16+5:302021-01-13T05:17:16+5:30
कौठा : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात असतांना या निवडणुकीत ...
कौठा : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात असतांना या निवडणुकीत आपल्या पॅनेलचा प्रचार करणारी प्रचारक मंडळी व काही मतदारही तालुक्याच्या ठिकाणी दिसत आहेत. या प्रचारामुळे शहरासह परिसरात असलेल्या हॉटेल, धाबे व खानावळी याठिकाणी गर्दी होत असून जत्रेचे स्वरुप येत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की खर्च हा आलाच, मग तो कोणत्या पद्धतीने करावयाचा हे तेथील मतदार व उमेदवार यांच्यावर अवलंबून असते. आता ग्रामपंचायत निवडणुकीत एका मतालाही फार महत्त्व आहे. प्रत्येकाचे मत मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत असून मतदारांचे मन वळविण्यासाठी काही खास प्रचारक मंडळीही तैनात करण्यात आली असल्याचे चित्र आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला तेव्हापासून खेड्यापाड्यातील प्रचारक मंडळीही सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तालुक्याचे ठिकाण असलेल्या वसमत शहरातच दिसत आहेत. प्रचारक शहरात असल्याने मग काही मतदार मंडळीही त्यांचा मागोवा घेत शहरात फिरत असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे निवडणूक गावात असतांना प्रचारक मात्र शहरात काय करत आहेत हा प्रश्न पडत आहे. तर दुसरीकडे वसमत शहर व परिसरातील रस्त्यावरील हॉटेल, धाबे व खानावळीवर मात्र मोठी गर्दी जमत असून उमेदवारांकडून मतदारांची खास सोय करण्यात येत असल्याने या सर्व हॉटेल व धाब्यांना जत्रेचे स्वरुप येत आहे. कौठा परिसरातील बोराळा, किन्होळा, धामणगाव गावात निवडणूक होत असून प्रचारही रंगात आला आहे.