4035 सदस्यांसाठी ग्रा.पं.ची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:18+5:302020-12-23T04:26:18+5:30
हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तीन टप्प्यांतील निवडणुका एकाचवेळी होत आहेत. तर यात तब्बल ४०३५ सदस्य ...
हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तीन टप्प्यांतील निवडणुका एकाचवेळी होत आहेत. तर यात तब्बल ४०३५ सदस्य निवडून द्यायचे आहेत. आता थेट जनतेतून सरपंच निवड रद्द झाली आहे. मात्र आरक्षणावरून असलेली चिंता कायम आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या जवळपास २० ते २५ हजार तरुण मतदारांना मतदानाचीही संधी मिळणार आहे. या नव्या मतदारांना संधी मिळते की नाही, असा प्रश्न काही दिवसांपूर्वीच्या गावपातळीवरील याद्या पाहिल्यानंतर निर्माण झाला होता. मात्र नंतर पुरवणी याद्या येणार असल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांना आता ही संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी जवळपास १८ हजार नवमतदार गावचा पुढारी निश्चित करणार आहेत. या मतदारांना या प्रक्रियेची मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
या निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरीही सरपंच पदाच्या आरक्षणात पुढे काय होईल, या चिंतेने अनेकांना ग्रासलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुरब्बी पुढाऱ्यांनाच पॅनलप्रमुख म्हणून महत्त्व येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर अनेक ठिकाणी या प्रमुखांनाही नेमका आरक्षणातील उमेदवारच पडला तर कसे? याची चिंता लागली आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी हे नक्की करा !
अर्जासोबत मालमत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे घोषणापत्र द्यावे लागणार आहे. ते नोटरी केलेले असावे. आरक्षित जागेवर निवडणूक लढविल्यास जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र/ पोहोच पावती आवश्यक आहे. सर्वसाधारणसाठी ५०० तर आरक्षित जागेसाठी १०० रुपये अनामतीची पावती लागेल.
शाैचालय वापर स्वसाक्षांकित किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, अपत्याचे घोषणापत्र, निवडणूक खर्चाबाबतचे हमीपत्र, ग्रा.पं. बेबाकीचे ग्रामसेवकाचे प्रामाणपत्र, ग्रा.पं. ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नवीन बॅंक खाते पासबूक व मतदार यादी पानाची झेराॅक्स लागेल, असे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सांगितले.