विद्युत मोटार पंप चोरट्यांना पकडले; १२ गुन्हे उघड
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: December 13, 2023 05:20 PM2023-12-13T17:20:26+5:302023-12-13T17:20:59+5:30
चोरट्यांकडून १.८४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
हिंगोली : शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर, कालव्यावर बसवलेल्या विद्युत मोटार, स्टार्टरची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांनी १२ ठिकाणी गुन्हे केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी १ लाख ८४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कालवा, विहिरीवर विद्युत मोटार पंप बसविले आहेत. पिकांना पाणी देण्याच्या ऐन वेळी विद्युत पंप चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या होत्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, औंढा ना. तालुक्यातील असोला शिवारातील विद्युत मोटारी देवबा पांडुरंग घुगे व अभिजित संतोष बांगर (दोघे रा. असोला) यांनी चोरी केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हट्टा पोलिस ठाणे हद्दीतील ७, बासंबा १, सेनगाव १, कुरूंदा, १, वसमत ग्रा. १ तसेच वसमत शहर पोलिस ठाणे हद्दीत एका ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
१२ गुन्हे उघडकीस
यावेळी त्यांच्याकडून १२ गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ विद्युत मोटारीसह मोटार पंप तोडून विक्री करून मिळालेले ५४ हजार ५०० रूपये व एक दुचाकी असा एकूण १ लाख ८४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, ज्ञानेश्वर सावळे, तुषार ठाकरे, इरफान पठाण, दिपक पाटील, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली.