बिल भरूनही वीज तोडली; संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात केले अर्धनग्न आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 08:58 PM2022-12-02T20:58:16+5:302022-12-02T21:00:59+5:30
बिल भरूनही विद्युत तोडणीच्या प्रकाराबदल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त
गोरेगाव (हिंगोली) : वीज प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे सुरू आहे. आज दुपारी वीज बिलाचा भरणा केला तरी शेतकऱ्यांची वीज का तोडता? असा सवाल करीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले.
सेनगाव तालुक्यात ऐन रब्बी हंगामात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देताना अडथळा निर्माण होत आहे. त्यात वीज कंपनीकडून सक्तीची वीज बिल वसुली केली जात आहे. बिलाचा भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून रोष व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांची वीज तोडणी तत्काळ थांबवावी, २०१८ पासून कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ रोहित्र द्यावे, चुकीची रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, विद्युत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, शेतीसाठी पूर्ण वेळ सुरळीत वीज पुरवठा करावा आदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोरेगाव येथील ३३ के. व्ही. उपकेंद्र कार्यालयासमोर ३० नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू आहे.
काही शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा केला तरी वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २ डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंत्याच्या दालनात अंगावरील कपडे काढून बिल भरणा केला तरी शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन का तोडता? असा सवाल उपस्थित केला. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, बळीराम सावंत महाराज, अर्जुन नायक आदींची उपस्थिती होती.