वीज वितरण कंपनीत आता बोगस डीपी रॅकेट; महावितरणला चुना लावत पैसे उकळण्याचा धंदा जोरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:42 AM2018-08-04T11:42:50+5:302018-08-04T11:45:53+5:30

कोणतीही परवानगी नसताना व अधिकृत एजन्सी नसतानाही डी.पी. बसवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Electricity distribution company now has a bogus DP racket; The money laundering business of Laxmi Mahavitaran looted | वीज वितरण कंपनीत आता बोगस डीपी रॅकेट; महावितरणला चुना लावत पैसे उकळण्याचा धंदा जोरात 

वीज वितरण कंपनीत आता बोगस डीपी रॅकेट; महावितरणला चुना लावत पैसे उकळण्याचा धंदा जोरात 

Next

वसमत (जि. हिेंगोली)  : वीज वितरण कंपनीत आता बनावट व परस्पर डी.पी. बसवून पैसे कमवण्याचे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर येत आहे. महावितरणलाही चुना लावण्याच्या या प्रकारात महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व गुत्तेदारांची साखळी आहे. कोणतीही परवानगी नसताना व अधिकृत एजन्सी नसतानाही डी.पी. बसवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महावितरणलाच शॉक  देणारी ही घटना दडपण्याचा प्रयत्न वितरणचे अधिकारी करत आहेत. एखाद्या शेतकऱ्याने आकडा टाकून वीज पुरवठा घेतला तर आकाश पाताळ एक करून वीजचोरीचे गुन्हे नोंदवण्याची कामगिरी वीज वितरण कंपनीचे अधिकारी करत असतात. मात्र वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे या गावात चक्क पाच डीपी दोन महिन्यांपूर्वी उभारून वीजपुरवठा करण्याचा प्रकार घडला तरी वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना खबरही नसल्याचे विचित्र चित्र समोर आले आहे.

वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे या गावात सिंगलफेजचे चक्क पाच डी.पी. दोन महिन्यांपूर्वी उभारले. या डी.पी.वरून विविध शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणे सुरू आहे. सिंगल फेज डीपी, डीपीपासून शेतकऱ्यांच्या कृषीपंपापर्यंत जोडणी नेण्यासाठी लागणारे खांब, तार व साहित्यही अवतरले. अविरत १५ दिवस काम करून हे पाच डीपी उभे झाले. त्यानंतर मुख्य वाहिन्यांवरून जोडण्याद्वारे वीजपुरवठा करूनही अखंडितपणे सुरू आहे. मात्र त्याची साधी खबरही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नव्हती म्हणे! वीज वितरणकडे न जाता परस्पर डीपी मिळतो, याची चर्चा वाढली व खाजगी डीपीसाठी गावोगावचे शेतकरी, गुत्तेदार शोधत फिरणे सुरू झाल्याने त्याचा बोभाटा झाला. अखेर प्रकरण अंगलट येवू नये, म्हणून वसमत ग्रामीणच्या सहाय्यक अभियंत्यांनी जाब जवाब नोंदवण्याचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करत पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून कपिल रोहिदास नवघरे (रा. बाभुळगाव)च्या विरोधात कलम १३८ विद्युत कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात कार्यालयाची परवानगी न घेता पाच डीपी बसवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. कदाचित या युवकाने हे गावासाठी केले असेल मात्र महावितरणचे दुर्लक्ष कसे?

दोषींना नोटीस 
याप्रकरणी वीज वितरणचे वसमत उपअभियंता एस.एस. कादरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वसमत ग्रामीण शाखाचे सहाय्यक अभियंता तंत्रज्ञ, लाईनमन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. कामात हलगर्जीपणा करण्यासह महावितरणला अंधारात ठेवणाऱ्यांवर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.वसमत ग्रामीणचे सहाय्यक अभियंता शंकर आडबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. आम्हाला हे काम कधी झाले, हे माहितच झाले नाही. पंधरा दिवसांपूर्वी झाले असावे, अशी उडवा-उडवीची उत्तरे त्यांनी दिली.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत फक्त विनापरवानगी विद्युत रोहित्र बसवण्याची तक्रार दिली आहे. तक्रारीत डीपी बसविण्याचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे जमा करून डीपी बसवणाऱ्या एका खाजगी व्यक्तीविरोधातच तक्रार दिली आहे. वास्तविक वीज वितरण कंपनीने हे रोहित्र कोठून आले? वीज वितरणकडील साहित्य या खाजगी इसमाला कोणी विकले? विजेचे खांब, तार, विद्युत जनित्र  कोठून उपलब्ध झाले? याची चौकशी करूनच यात सहभागी गुत्तेदार, एजन्सी व झारीतील शुक्राचायर्यांवर तक्रार देणे अपेक्षित होते. मात्र केवळ या प्रकारणावर पडदा टाकण्यासाठी व स्वत:ला सेफ करण्याचाच प्रयत्न तक्रारीद्वारे झाल्याचे दिसत आहे.   पिंपळा चौरे येथे झालेला हा प्रकार पहिला नसून असे अधिकृतरीत्या अनेक गावांत रोहित्र बसवलेले असल्याचीही धक्कादायक चर्चा होत आहे. यावरून बनावट व विनामंजुरी, विनापरवानगी, विनातपासणी रोहित्र बसवण्याचे मोठे रॅकेटच कार्यरत असल्याचे स्पष्ट होते. पिंपळा चौरे येथे रोहित्र बसविण्यासाठी प्रतिरोहित्र  ५० ते ७५ हजार रुपये वसुली झाल्याचेही समोर येत आहे. त्याचे वाटेकरी कोण?

Web Title: Electricity distribution company now has a bogus DP racket; The money laundering business of Laxmi Mahavitaran looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.