जिल्हा रुग्णालय बुडाले अंधारात; रुग्णांसह नातेवाईकांची गैरसोय; लहान मुलंही उकाड्यानं हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 11:10 PM2021-06-30T23:10:42+5:302021-06-30T23:13:37+5:30
दुसरीकडे रुग्णालयातील इतर वार्डांची वीज मात्र रात्री ९ वाजेपर्यंतही सुरळीत झाली नव्हती. रुग्णालयाचे जनरेटर लावूनही वीज येत नव्हती.
हिंगोली- येथील जिल्हा रुग्णालयात ३० जून रोजी दुपारी १२ वाजेपासून खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे रुग्णालय प्रशासनाची दाणादाण उडाली. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले. मात्र इतर आजारांच्या सर्वसाधारण रुग्णांना मरणयातना भोगण्याची वेळ आली. (Electricity issue in the District Hospital Inconvenience to relatives with patient)
आज दुपारपासून संपूर्ण जिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सुरुवातीला महावितरणची वीज खंडित झाली होती. मात्र नंतर जनरेटर लावून वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड झाला, हे कळत नव्हते. त्यामुळे महावितरणकडून वीज खंडित झाल्याचे समजून त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. मात्र एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा सुरळीत असल्याचे समोर आले. या सर्व प्रकारात सायंकाळचे पाच वाजले होते. त्यानंतर कोरोना वार्डातील रुग्णांना नवीन कोविड सेंटरमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. लगेच या वार्डाची वीजही सुरळीत झाली होती. मात्र या वार्डाची इतरही डागडुजी करायची असल्याने रुग्णांना तत्काळ हलविले. जवळपास ३० रुग्ण नवीन रुग्णालयात नेले.
दुसरीकडे रुग्णालयातील इतर वार्डांची वीज मात्र रात्री ९ वाजेपर्यंतही सुरळीत झाली नव्हती. रुग्णालयाचे जनरेटर लावूनही वीज येत नव्हती. यामुळे रुग्णांसह त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. यावरून रुग्णांमधून ओरड होत होती. बाळंत महिला, लहान मुले, गंभीर आजारी रुग्ण या उकाड्याने हैराण झाले होते. शिवाय अंधारात डासांचाही मोठा त्रास सोसावा लागत होता. रात्री उशिरा रुग्णालयाची भूमिगत वीजवाहिनी निकामी झाल्याचे कळाले. त्यानंतर नवीन केबल आणून समांतर वायरिंग करण्याबाबतचा विचार केला जात होता. मात्र त्यानंतरही वीज सुरळीत होईल की आणखी काही अंतर्गत अडचण आहे. हे कळायला मार्ग नव्हता. महावितरणच्या नावाने खडे फोडली जात असल्याने याबाबत विचारले असता, एक्सप्रेस फिडरवरून सुरळीत वीजपुरवठा आहे. मात्र रुग्णालयाची अंतर्गत अडचण आहे. त्यासाठी आम्ही आमचे कर्मचारी मदतीला दिल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.
मोबाईलच्या बॅटरीवर उपचार -
दुपारी १२.३० वाजल्यापासून वीज नाही. माझी सून येथे बाळंतीण झाली. तिचे सिझर झाले. येथे प्रचंड उकाडा होत आहे. त्यामुळे सर्वच रुग्णांना मोठा त्रास होत आहे. रात्रभर वीज आली नाही तर रुग्णांना मरणयातना भोगाव्या लागणार आहेत. ही समस्या सुटण्यास एवढा वेळ का लागत आहे हे कळत नाही.
-अनिता कटारिया
माझी मुलगी येथे उपचारासाठी दाखल आहे. दुपारपासून वीज खंडित झाली आहे. त्यामुळे सगळे रुग्ण तर हैराण आहेतच. पण डॉक्टर व परिचारिकांचाही या अंधारामुळे गोंधळ उडत आहे. मोबाईलच्या बॅटरीवर रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.
- माणिक गणेश राठोड
तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित झाली आहे. कोविड वार्डाची वीज सुरळीत झाली. मात्र दुरुस्तीसाठी इतरत्र रुग्ण हलविले. मुख्य इमारतीतील बिघाडाचा शोध घेवून लवकरच वीज सुरळीत केली जाईल.
- डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक
जिल्हा रुग्णालयात आज नेहमीप्रमाणेच भेट दिली. कोरोना वार्डाची डागडुजी करायची असल्याने रुग्ण नवीन कोविड सेंटरला हलवायचे आधीच नियोजन होते. वीज समस्या आहे. मात्र दुरुस्तीचे कामही सुरू आहे. यामुळे रुग्णांची अडचण होवू नये, यासाठी जनरेटर आहे.
- रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी