अवैध दारूविरोधात एल्गार; कनक्यातील महिला पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या
By विजय पाटील | Published: August 22, 2023 02:31 PM2023-08-22T14:31:37+5:302023-08-22T14:31:45+5:30
हिंगोली तालुक्यातील कनका येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
हिंगोली : तालुक्यातील कनका येथे अवैध दारूविक्री वाढली असून यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. या अवैध विक्रीला आळा घालण्याच्या मागणीसाठी महिला आ. प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वात पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या.
हिंगोली तालुक्यातील कनका येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावातील इतर पुरुष मंडळींसोबतच लहान मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे गावात तंटेही निर्माण होत आहेत. गावातील सलोख्याचे वातावरण खराब होत आहे. महिला व शाळेत जाणाऱ्या मुलींनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी बासंबा पोलिसांत वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता गावात परिस्थिती आणखीच बिकट होत चालली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. दारू विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यावेळी आ. प्रज्ञा सातव यांच्यासह कमल मस्के, शांताबाई इंगोले, कावेरा मस्के यांच्यासह २० ते २५ महिला उपस्थित होत्या.