मालकाचे पैसे ऑनलाईन रम्मीत हारला; मित्राच्या सल्ल्याने केलेला चोरीचा बनाव आला अंगलट
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: August 30, 2023 05:26 PM2023-08-30T17:26:11+5:302023-08-30T17:26:44+5:30
मित्रांचा सल्ला घेतला अन् पोलिसांच्या जाळ्यात फसला
हिंगोली : मालकाचे ५० हजार रूपये ऑनलाईन रम्मीमध्ये हारला. आता मालकाला काय उत्तर द्यायचे? म्हणून मित्राच्या मदतीने एकाने चोरट्यांनी जबरी पैसे काढून घेतल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव पोलिसांच्या तपासणीत उघड झाला. आता पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोलीतील श्याम नेनवाणी यांचा डेली निड्सचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे नितीन पंजाबराव चिपाडे (रा. जोडतळा ता. हिंगोली) हा कामाला आहे. तो डेली निड्सचा माल डिलिव्हरी करतो. २८ ऑगस्ट रोजी त्याने माल डिलिव्हरी केली. यात ५० हजार रूपये आले होते. त्यानंतर रात्री तो जोडतळा ते माळहिवरा रोडने घरी जात होता. यावेळी चोरट्यांनी रस्ता अडवून जवळचे ५० हजार रूपये बळजबरीने काढून घेतल्याची तक्रार देण्यासाठी तो बासंबा पोलिस ठाण्यात दाखल झाला. जबरी चोरीचे प्रकरण असल्याने सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी तत्काळ चोरट्यांचा शोध घेण्याची तयारी सुरू केली. मात्र नितीन चिपाडे यांच्या बोलण्यात विसंगती येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता यात डेली निड्सचा माल डिलिव्हरी करून आलेले ५० हजार रूपये नितीन चिपाडे हा ऑनलाईन रम्मीत हरल्याचे समोर आले. मालकाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्याने जबरी चोरीचा बनाव केला असल्याचेही स्पष्ट झाले.
मित्रांचा सल्ला घेतला अन् पोलिसांच्या जाळ्यात फसला
यात नितीन चिपाडे याने मालकाचे ५० हजार रूपये ऑनलाईन रम्मीत हरल्याची बाब मित्र सतीश शंकर थोरात व अविनाश गौतम डोंगरदिवे ( दोघे रा. जोडतळा) यांना सांगितली. त्यांनीच जबरी चोरीची खोटी फिर्याद देण्याबाबतची कल्पना दिली. मात्र पोलिसांच्या तपासणीत त्यांचा भांडाफोड झाला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गुलाब खरात यांच्या फिर्यादीवरून नितीन चिपाडे, सतीश थोरात, अविनाश डोंगरदिवे यांचेवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.