एकच नारा, नोकरीत कायम करा; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भर पावसात आंदोलन
By रमेश वाबळे | Published: November 28, 2023 06:55 PM2023-11-28T18:55:30+5:302023-11-28T18:56:34+5:30
तोडगा निघेना; ३६ दिवसांपासून बेमुदत संप सुरूच, कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर
हिंगोली : शासन सेवेत समायोजन करावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मागील ३६ दिवसांपासून हा संप सुरू असला तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. २८ नोव्हेंबर रोजी दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असतानाही या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास पाचशेंवर कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर आरोग्य सेवा बजावावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या महागाईत हाती येणाऱ्या मानधनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शासन सेवेत समायोजन करावे यासाठी कर्मचाऱ्यांनी २५ ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारला आहे. संप सुरू होऊन सुमारे ३६ दिवस उलटत आहेत. परंतु, शासनस्तरावरून तोडगा काढण्यात आलेला नाही. परिणामी, हा संप सुरूच असून, कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मंगळवारीही अधूनमधून पाऊस सुरू होता. या पावसात कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले. काही जणांनी छत्रीचा आधार घेत आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. यावेळी श्रीपाद गारूडी, विशाल ठोंबरे, अमोल दरगू, अमोल कुलकर्णी, राजू नरवाडे, पूजा गिरी, सुकेशिनी ढवळे, सचिन रूपूरकर, वाघमारे, सोळंके, खिल्लारे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.