हिंगोलीत जुन्या पेन्शनसाठी दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संप सुरूच
By विजय पाटील | Published: March 15, 2023 06:37 PM2023-03-15T18:37:39+5:302023-03-15T18:37:56+5:30
जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे.
हिंगोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसह इतर मागण्यांसाठी दुसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प.समोर मंडप टाकून कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत पेन्शनची मागणी केली.
जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. महसूल, आरोग्य, शिक्षण, जि.प., बांधकाम अशा अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. न.प.च्या कर्मचाऱ्यांनी या संपातून आज माघार घेतली आहे. काल या मंडळींनी संप पाळला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांचे संपकरी सकाळपासूनच जमले होते. त्यांनी या ठिकाणी एकच मिशन, जुनी पेन्शन असे लिहिलेल्या टोप्या घालून या मागणीसाठी घोषणाबाजी केली. महसूलसह आरोग्य, शिक्षण व इतर विभागातील कर्मचारीही या ठिकाणी दिसून येत होते. याशिवाय जि.प.समोरही जि.प.च्या कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून जुनी पेन्शनच्या मागणीची घोषणाबाजी केली.