अखेर नातेवाईकांनीच पीपीई कीट घालून केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 04:00 PM2020-10-02T16:00:59+5:302020-10-02T16:01:39+5:30
कोरोनाग्रस्त शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु प्रेत अंत्यसंस्काराला नेण्यासाठी रूग्णवाहिकाच मिळाली नाही. रूग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त नातेवाईकांनी स्वत:च पीपीई किट घालून एका खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.
हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु प्रेत अंत्यसंस्काराला नेण्यासाठी रूग्णवाहिकाच मिळाली नाही. रूग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त नातेवाईकांनी स्वत:च पीपीई किट घालून एका खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.
दि.२ रोजी पहाटे ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कळमनुरी येथील कोरोनाग्रस्त शिक्षक हिंगोली जिल्हा रूग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. प्रकृती खालावल्याने दि. १ रोजी रात्री १० वा. त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी केली. मात्र रुग्णालयातून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. रुग्णवाहिका नसल्याचे सांगत १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाविण्यास सांगण्यात आले. परंतु संपर्क झालाच नाही.
त्यामुळे जि. प. सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णवाहिकेच्या चालकास पीपीई किट दिली. नातेवाईकांनीही पीपीई किट घालून मृतदेह सोबत घेतला आणि अंत्यसंस्कार केले.