प्रेयसीच्या धाकट्या बहिणीला ब्लेडने वार करुन संपवलं; आरोपीला आता कोर्टाचा दणका!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 05:22 PM2024-12-09T17:22:10+5:302024-12-09T17:22:35+5:30
धाकटी मुलगी आणि एक मुलगा घरी एकटा असल्याने फिर्यादीने त्याच्या मोठ्या मुलीस आणि एका मुलास घरी पाठवले. त्यानंतर काही वेळाने मुलगा शेतात धावत आला.
लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : प्रेमप्रकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या अल्पवयीन बहिणीचा ब्लेडने वार करून खून करणाऱ्या आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे (रा. नांदूसा, ता. हिंगोली) यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेसंदर्भात बासंबा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, २१ मे २०२० रोजी फिर्यादीची धाकटी मुलगी तसेच एक मुलगा घरी होता. तर फिर्यादी, त्याची पत्नी आणि मोठी मुलगी हे शेतात काम करीत होते. धाकटी मुलगी आणि एक मुलगा घरी एकटा असल्याने फिर्यादीने त्याच्या मोठ्या मुलीस आणि एका मुलास घरी पाठविले. काही वेळाने मुलगा शेतात धावत आला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर घरी येऊन पाहिले असता, धाकटी मुलगी मरण पावली होती. या प्रकरणी फिर्यादी पित्याने बासंबा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
पोलिसांनी तपास करून प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. मोठ्या बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणात लहान बहिणीचा अडथळा होत असल्याचे व त्यातूनच आरोपी बालाजी याने ब्लेडने वार करून लहान बहिणीचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते, असे सरकारी वकिलांनी सांगितले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांच्या न्यायालयासमोर चालविण्यात आले. सहायक सरकारी वकील सविता एस. देशमुख यांनी या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासले व अंतिम युक्तिवाद केला. साक्षीपुराव्याअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी आरोपी बालाजी आडे यास कलम ३०२ भादंवि अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची ५००० रुपयांची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सविता एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सरकारी वकील एस. डी. कुटे, एन. एस. मुटकुळे यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. डी. डोईजड यांनी सहकार्य केले.