रस्त्याच्या मागणीसाठी संपूर्ण वाडी धडकली जिल्हा कचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 03:08 PM2017-05-25T15:08:05+5:302017-05-25T15:09:36+5:30
पेडगाववाडी येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थ घराला कुलूप लावून मुला-बाळांसह जिल्हा कचेरीवर धडकले.
Next
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 25 - पेडगाववाडी येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थ घराला कुलूप लावून मुला-बाळांसह जिल्हा कचेरीवर धडकले.
पेडगाववाडी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची पेडगावपासून दीड किमी अंतरावरील वस्ती आहे. त्यांना चारही बाजूने रस्ता नाही. दहा फुटांचा एक पारंपरिक रस्ता होता. तोही खस्ता हाल होता. येथील मुले बाहेरगावी शिक्षणासाठी आहेत. त्यांना एक किमी अंतर पायी जावून चिखल तुडवत मुख्य रस्ता गाठावा लागतो.
याहीपेक्षा जास्त हाल तर बाळंतिणीचे होतात. त्यांना बाजेवर टाकूनच न्यावे लागते. त्यातच दोन महिन्यांपूर्वी असलेला रस्ताही संबंधित शेतक-यांनी ताब्यात घेतला आहे. त्यानंतर तहसील, जिल्हा कचेरीला निवेदने दिली. रस्ता देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र पुन्हा हा रस्ता नांगरुन टाकण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यामुळे अख्खी पेडगाववाडी जिल्हा कचेरीवर धडकली आहे. महिला, पुरुष, लहान मुले, वृद्ध असे सर्वांनाच घेवून ही मंडळी आली होती. आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी या मंडळीने केली आहे. आजोबा-पणजोबाच्या काळापासून रस्ता होता. आताच तो अडवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नोंद नाही, प्रस्तावित मात्र आहे
शासन दरबारी या गावासह रस्त्याचीही नोंद नाही. नवीन विकास आराखड्यात बासंबा-सिरसम रस्ता तेथून जाणार आहे. मात्र तो होईल कधी, याची शाश्वती नाही. त्यामुळे ५३५ एवढी लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांसमोर गंभीर पेच निर्माण झाला आहे.