एल्गार महामेळाव्यात प्रत्येकाची तपासणी करूनच रामलीला मैदानात ‘एन्ट्री’
By रमेश वाबळे | Published: November 26, 2023 04:05 PM2023-11-26T16:05:31+5:302023-11-26T16:06:18+5:30
ओबीसी एल्गार महामेळाव्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
रमेश वाबळे, हिंगोली: शहरातील रामलीला मैदानावर आज ओबीसी समाजाचा मराठवाडास्तरीय दुसरा एल्गार महामेळावा घेण्यात येत असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरीकाची डिटेक्टरद्वारे तपासणी करूनच मैदानात प्रवेश दिला जात आहे.
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ओबीसी समाजाच्या एल्गार महामेळाव्यास सकाळी ११ वाजेपासून सुरूवात झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा घेण्यात येत असून, या ठिकाणी हिंगोली, परभणी, नांदेडसह मराठवाड्यातून ओबीसी बांधव उपस्थित झाले आहेत. मेळाव्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, मागील दोन दिवसांपासून बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येत होता. आज सकाळपासून रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेटस् लावण्यात आले असून, वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. तर रामलीला मैदान परिसरात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात आल्यानंतरच मेळावास्थळी सोडण्यात येत आहे. बंदोबस्तासाठी हिंगोलीसह परजिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.