शनिवार, रविवार वगळून अत्यावश्यक सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:40+5:302021-06-01T04:22:40+5:30

हिंगोली : जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत शनिवार व रविवार वगळता इतर दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने ...

Essential services continue except Saturdays and Sundays | शनिवार, रविवार वगळून अत्यावश्यक सेवा सुरू

शनिवार, रविवार वगळून अत्यावश्यक सेवा सुरू

Next

हिंगोली : जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत शनिवार व रविवार वगळता इतर दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्याची व काहींना घरपोच सुविधा देण्यासाठीचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारचे अन्न जसे चिकन, मटण, पोल्ट्री, अंडी आणि मासे, पाळीव प्राणी, खाद्यविक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य विक्रेते यांना शनिवार व रविवार वगळता रोज सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत दुकाने उघडता येणार आहेत. पूर्वीपेक्षा वेळ वाढवून दिला आहे. दूधविक्रेत्यांना रोज सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी असेल. ई-कॉमर्स, कुरिअर सेवा या दैनंदिन चालू राहतील. बाजार समिती, कृषीसंबंधित दुकाने पूर्वीप्रमाणेच सकाळी ९ ते ६ वेळेत दैनंदिन सुरू राहतील. अत्यावश्यक व्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित दुकाने व आस्थापना सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत केवळ घरपोच सेवा देऊ शकतील. खानावळ, रेस्टॉरंट यांना केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी ६ ते १५ मेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत परवानगी राहील. या दुकानांच्या मालाच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार नाहीत.

कार्यालयीन उपस्थिती २५ टक्के अथवा गरजेनुसार ठेवता येईल. यात कोविड सेवा देणाऱ्यांना वगळले आहे. लग्नासाठी केवळ कोर्ट मॅरेजला परवानगी आहे. खासगी प्रवासी वाहतूक केवळ ई-पास असल्यास ५० टक्क्यांच्या मर्यादेत, तेही अत्यावश्यक कारणासाठी परवानगी राहील. तर खासगी बसेस वाहतूक मनाई केली. आगारातून सोडणाऱ्या बसेस कार्यरत राहतील. इतर आगारांच्या बसेस थेट स्थानकात थांबतील. मालवाहतुकीच्या वाहनांना बाहेर राज्यातून माल येत असेल तर ४८ तास अगोदरची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. ते सात दिवसांसाठी वैध मानण्यात येईल.

नोंदणीकृत उद्योग चालू ठेवता येतील. त्यासाठी तहसीलकडून ओळखपत्र घ्यावे लागेल. मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार संवेदनशील राज्यातून येणाऱ्या नागरिक अथवा कामगारांसाठी निश्चित केलेले निर्बंध इतर राज्यांतून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी लागू राहतील. इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांनी ४८ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे; तर ती नसल्यास विलगीकरणात पाठविण्यात येणार आहे.

या आदेशानुसार १५ जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत निर्बंध पाळणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. यात दिरंगाई केल्यास अथवा आदेश न पाळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

बँकांत शेतकऱ्यांनाही एक दिवस

जिल्ह्यातील सर्व बँका या कालावधीत त्यांच्या नियमित वेळा पत्रकानुसार कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहतील. तसेच या कालावधीत बँका दैनंदिन शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी सुरू ठेवता येतील. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या अनुषंगाने असणाऱ्या कामांसाठी बँका दि. १, ३, ५, ७, ९, ११, आणि १४ जूनला सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत चालू राहतील. तर नागरिकांच्या कामासाठी बँका २, ४, ८, १०, आणि १४ जूनला सकाळी १० ते ४ या वेळेत चालू राहतील. तसेच बँकेच्या बीसी व सीएसपीजला पूर्णवेळ कामासाठी परवानगी राहील. तर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये आता १ ते १५ जूनदरम्यान कार्यालयीन वेळेत रोज सुरू राहतील.

Web Title: Essential services continue except Saturdays and Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.