'सीएमपी' प्रणालीनंतरही शिक्षकांच्या पगाराला विलंबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 01:19 PM2021-06-24T13:19:02+5:302021-06-24T13:20:08+5:30
जिल्ह्यात जवळपास चार हजारांवर शिक्षक व एक ते दीड हजार पेन्शनर्ससाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी होती.
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना एका क्लिकवर वेतन मिळेल, असे सांगून सुरू करण्यात आलेली सीएमपी प्रणालीही वेळेत वेतन अदा करण्यात कुचकामी ठरत असून, शिक्षकांना विलंबाचाच सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात जवळपास चार हजारांवर शिक्षक व एक ते दीड हजार पेन्शनर्ससाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी होती. या सर्वांच्या वेतनाचे जवळपास २८ कोटी रुपये दर महिन्याला अदा करावे लागतात. ही प्रणाली आल्यानंतर वेळेत वेतन अदा होईल, ही आशा मात्र फोल ठरली आहे. मार्चचे वेतन २० मे रोजी मिळाले, तर एप्रिलचे वेतन होण्यासाठीच ४ जून उजाडल्याने आता मे महिन्याचे वेतन कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे. शासनाकडून वेतनासाठीची तरतूद प्राप्त झालेली आहे. शिक्षण विभाग व वित्त विभागाचा ताळमेळ मात्र होणे बाकी आहे. ही प्रणाली चालविण्यासाठी शिक्षण विभागाने पायाभूत माहिती सादर करणे आवश्यक असते. त्यातही वेतनामध्ये दरमहा फारसा बदल होण्याची चिन्हे नसतात. काही जणांच्याच वेतनातील बदल तेवढा केला की, या प्रणालीने वेतन अदा करणे सोपे असल्याचे सांगितले जात होते.
देयके वेळेत सादर होणे महत्त्वाचे
वित्त विभागाकडे शिक्षकांच्या वेतनाची देयके ज्या दिवशी सादर होतात, त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सर्व प्रक्रिया करून वेतन अदा करण्यात येते. शिक्षकांची संख्या कमी किंवा जास्त असा या प्रणालीवर कोणताच परिणाम होत नाही. फक्त देयके वेळेत सादर होणे जास्त महत्त्वाचे आहे.
- मनोज पाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी
सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांना वेळेत वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्याच पद्धतीने कारभार सुरू आहे.
- रामदास कावरखे, शिक्षक संघटना