धक्कादायक ! भरमसाठ हुंडा घेऊनही हळदीच्या दिवशी दिला नवरदेवाने लग्नाला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:22 PM2020-03-04T14:22:58+5:302020-03-04T14:27:44+5:30
नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल
कुरूंदा (जि. हिंगोली) : लग्नाचा मुहूर्त ठरला, हुंडाही घेतला, साखरपुडाही झाला. अन्, ऐन लग्नाच्या एकदिवस अगोदर हळदीच्या दिवशी नवरदेवाने मुलीच्या घरी येण्यास नकार देत मुलगी पसंत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी नवरदेव संदीप पाचपुते व त्याचे आई-वडील अशा तिघांविरूद्ध कुरूंदा पोलीस ठाण्यात २ मार्च रोजी गुन्हा करण्यात आला आहे. ही घटना वसमत तालुक्यातील सुकळी येथे घडली.
सुकळी येथील फिर्यादीच्या मुलीचा विवाह कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथील मुलासोबत ठरला होता. डिसेंबर २०१९ मध्ये सोयरिक झाली. स्थळ जुळले होते. यामध्ये १ लाख ७५ हजार रुपये, ५ ग्रॅमची अंगठी, घड्याळ, कपडे, संसारोपयोगी साहित्य देण्याचे ठरले होते. २० डिसेंबर २०१९ रोजी सुकळी येथे साखरपुडा पार पडला. जवळपास २०० ते ३०० लोकांना जेवू घातले. ठरल्याप्रमाणे १ लाख ७५ हजार, ५ ग्रॅमची अंगठी, घडी देण्यात आली. त्यानंतर कपडे घेऊन देण्यात आले.
३ मार्च रोजी सकाळी ११.४४ वाजता लग्नाची तारीख ठरल्याने पत्रिका वाटप करण्यात आल्या होत्या. लग्नाची तयारीदेखील झाली होती. लग्नाच्या एक दिवस अगोदर २ मार्च रोजी हळदीच्या दिवशी नवरदेवाच्या वडिलाने नवदेवाला मुलगी पसंत नाही, तो लग्नास नकार देत असल्याचे सांगितले. लग्नाची सर्व तयारी झाली असल्यानंतर वराकडील मंडळींकडून नकार येताच या फसवणुकीमुळे वधूकडील मंडळी हादरून गेले. याप्रकरणी वरांकडील मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल होताच पसार
लग्नाला नकार दिल्यानंतर मुलीकडील मंडळींनी कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी नवरदेव संदीप पाचपुते, वडील शिवप्रसाद पाचपुते, आई उषाबाई पाचपुते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच हे तिघेही पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.